‘कोणीतरी जाऊन धोनीशी चर्चा करा रे!’माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांचे आवाहन

5

सामना प्रतिनिधी । बडोदे

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूंबाबत निर्णय घेताना निवड समितीने सगळ्या शक्यतांचा विचार करणे गरजेचे आहे. निवड समिती सदस्यांनी धोनीशी त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली पाहिजे. तसेच निवड समितीला धोनीबाबत काय वाटते हेदेखील त्यांनी धोनीला सांगितले पाहिजे. असे केल्यास खेळाडू आणि निवडकर्ते यांच्यात कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही आणि याचा हिंदुस्थानी क्रिकेट संघाला फायदाच होईल, असे आग्रही मत हिंदुस्थानी संघाचे माजी यष्टीरक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे.

टीम इंडियाचे आव्हान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली, पण धोनीने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत बर्‍याच चर्चा सुरू आहेत. या दरम्यान माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. निवड समितीने धोनीशी त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे, असे मोरे यांनी सुचवले आहे.

नव्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या !

विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने कशा पद्धतीची कामगिरी केली आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पुढील दोन वर्षांत कसा अधिक परिपक्व होईल, त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. सध्याच्या खेळाडूंसाठी आपल्याकडे बॅक-अप खेळाडू तयार असायला हवा आणि नव्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी देण्यात यायला हवी, असेही मोरे यांनी नमूद केले.