धार्मिक स्थळाजवळ विकायचा ड्रग्ज 

मालाड येथे धार्मिक स्थळाजवळ ड्रग्ज विक्री करणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट-11 ने अटक केली. मोहम्मद निजामुद्दीन शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार लाख रुपयांचे एमडी जप्त केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो ठरलेल्या ग्राहकांना ड्रग्ज देण्यासाठी धार्मिक स्थळाजवळ बोलावत असायचा.

मालाड परिसरातील एका धार्मिक स्थळाजवळ एकजण ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती युनिट-11 ला मिळाली. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक सचिन गवस, सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, आदी पथकाने तेथे सापळा रचला. बुधवारी रात्री शेख हा धार्मिक स्थळाजवळ दिसला. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. शेख हा गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्जचा धंदा करत होता. तो त्याच्या ठरलेल्या ग्राहकांना एमडी किंवा इतर ड्रग्ज देण्यासाठी धार्मिक स्थळाजवळ बोलावत असायचा. धार्मिक स्थळाजवळ पोलीस पकडणार नाहीत असे त्याला वाट होते. ड्रग्जप्रकरणी शेखविरोधात गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.