
सर्वस्व पणाला लावून केलेल्या संघर्षात सेनेगलने 2 गोल करीत इक्वाडोरविरुद्धचे युद्ध जिंकले आणि फिफा वर्ल्ड कपच्या ‘ए’ गटातून बाद फेरीत धडक मारली. आता उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ ‘बी’ गटाच्या संभाव्य विजेता असलेल्या इंग्लंडशी पडू शकते. आतापर्यंत वर्ल्डकपमधून फ्रान्स, ब्राझील, नेदरलॅण्ड्स आणि पोर्तुगाल असे पाच संघ बाद फेरीत पोहोचले आहेत.
फिफा वर्ल्ड कपच्या दुनियेत 2002 साली प्रवेश करणाऱ्या आफ्रिकन खंडातल्या सेनेगलने पदार्पणातच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते. त्याच छोटय़ाशा देशाने कतारमध्येही बडा धमाका केला आहे. आपला केवळ तिसराच वर्ल्ड कप खेळत असलेल्या सेनेगलने आज इक्वाडोरला वर डोके काढूच दिले नाही. जास्तीत जास्त चेंडूवर आपले नियंत्रण आपले कसे राहील, यासाठी इस्मायला सार, कलीदो कुलीबाली यांनी जोरदार खेळ केला. दुसरीकडे इक्वाडोरचे आक्रमकही त्यांच्याशी पंगा घेत चेंडूला आपल्या दिशेने वळवण्याचा घनघोर प्रयत्न करीत होते. दोघांचा खेळ इतका भन्नाट होता की पहिले 43 मिनिटे केवळ गोलाचे प्रयत्नच होत होते, पण 44 व्या मिनिटाला इस्मायला सारने केलेल्या गोलने सेनेगलची देहबोलीच बदलून टाकली. या गोलमुळे पहिला हाफ संपता संपता का होईना सेनेगल मानसिकदृष्टय़ा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफमध्ये सेनेगल आणखी आक्रमक झाला. त्यामुळे इक्वाडोरसुद्धा जिंकू पिंवा मरू म्हणून खेळू लागले. 67 व्या मिनिटाने सामन्यात रंग भरला. इक्वाडोरला मिळालेल्या कॉर्नर किकला आंगल मेनाने असे मारले की फेलिक्स टोरेसने त्याला हेडर केले आणि मॉयसेस कायसेदोने त्याला अलगदपणे सेनेगलच्या गोलजाळ्यात मारले. या अफलातून गोलमुळे इक्वाडोरच्या चमूत नवचैतन्य संचारले, पण अवघ्या तीन मिनिटांनीच कलीदो कुलीबालीने सेनेगलसाठी दुसरा गोल केला. हाच गोल सेनेगलसाठी अंतिम सोळात स्थान मिळवून देणारा ठरला.
आजच्या लढती
टय़ुनिशिया–फ्रान्स ः दुपारी 3.30 वाजता
ऑस्ट्रेलिया–डेन्मार्क ः सायं. 6.30 वाजता
पोलंड–अर्जेंटिना ः रात्री 9.30 वाजता
सौदी अरेबिया–मेक्सिको ः मध्यरात्री 12.30 वाजता