कोलंबियाचे पाऊल पडते पुढे, फेअर प्ले गुणांमुळे जपानची आगेकूच

सामना ऑनलाईन । वोल्गोग्रॅड

रशियात सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमधील आफ्रिका खंडाचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. या खंडाचे एकमेव आशास्थान असलेल्या सेनेगलला कोलंबियाकडून १-० अशा फरकाने हार सहन करावी लागल्यामुळे त्यांना साखळीतच बाद व्हावे लागले. कोलंबियाने मात्र दोन विजयांसह ‘एच’ गटात अव्वल स्थान पटकावले आणि बाद फेरीचे तिकीट बुक केले. अन्य लढतीत पोलंडने जपानला १-० असे हरवत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला, पण याआधीच्या दोन पराभवांमुळे पोलंडला या विजयाचा फायदा झाला नाही. त्यामुळे पराभूत झाल्यानंतरही चार गुणांसह जपानने दुसऱया स्थानावर झेप घेत अंतिम १६ फेरीत प्रवेश केला. यलो कार्डची संख्या सेनेगेलच्या तुलनेत कमी असल्यामुळे (फेअर प्ले गुण) जपानला पुढे पाऊल टाकता आले. आशिया खंडाची मदार आता एकटय़ा जपानवर आहे.

सर्वच समसमान पण…
जपान व सेनेगल यांचे साखळी फेरीत समसमान चार गुण झाले होते. यावेळी गुणांसह गोलफरक, गोल यांचीही संख्या एकसारखीच होती. त्यामुळे दोन संघांमधील फरक यलो कार्डवर ठरवण्यात आला आहे. जपानच्या खेळाडूंना सेनेगल खेळाडूंच्या तुलनेत कमी यलो कार्ड मिळाल्यामुळे त्यांना घोडदौड करता आली. पोलंडच्या यान बेडनॅरेक याने ५९व्या मिनिटाला गोल करीत जपानवर विजय मिळवून दिला. दरम्यान, ७४ व्या मिनिटाला येरी मिनाने गोल केल्यामुळे कोलंबियाने सेनेगलला हरवले.

आपली प्रतिक्रिया द्या