आमदार खरेदी प्रकरणात भाजप नेते बी. एल. संतोष आरोपी, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शंभर कोटी रुपये देऊन तेलंगाणातील चार आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र ‘खोक्यांचे’ आमीष दाखवून आमदार फोडण्याचा हा प्रयत्न तेलंगाणा राष्ट्र समितीच्या आमदारांनी हाणून पडला होता. मात्र आता याप्रकरणी तेलंगणा पोलिसांच्या एसआयटीने गुरुवारी भाजप नेते बी. एल. संतोष आणि अन्य तीन जणांना आरोपी घोषित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या सात एवढी झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भाजप नेते संतोष यांना दुसरी नोटीस बजावली असून त्यांना 26 किंवा 28 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

आमदारांच्या या फोडाफोडीच्या प्रयत्नात भाजपचा हात असल्याचा आरोप याआधीच करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने भाजपचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांना देण्यात आले होते. मात्र याला तेलंगाणा भाजपने विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता एसआयटीने बी. एल. संतोष यांना या प्रकरणी आरोपी घोषित केले आहे.

एसआयटीने या प्रकरणी देशातील चार राज्यांमध्ये धाडी घातल्या होत्या. तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणामधील सात ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या होत्या. आमदार खरेदी प्रकरणात धर्मगुरू आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले होते.