वृद्धेचा खून करणाऱ्या तिघांना ६ वर्षे सक्तमजुरी

45

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शेत जमीन हडपण्यासाठी वृध्देचा खून करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एच. महाजन यांनी दोषी ठरवून सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवार येथील हिराबाई गिरी यांची धानोरा शिवारामध्ये शेती आहे. ती शेती हडप करण्यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नानासाहेब यमाजी काकडे (६०) याची नजर होती. ही शेत जमीन विकण्यासाठी त्याने हिराबाईला गळ घालून त्यांना रजिस्ट्री करण्यासाठी १५ एप्रिल २०१३ रोजी सिल्लोड येथे घेऊन गेला. हिराबाई यांच्या मुलींना पूर्वसूचना न देता शेत जमिनीची कागदपत्रे तयार केली. दरम्यान हिराबाईच्या दोन्ही मुली सिल्लोड येथे आल्याचे कळल्यावर हिराबाईने रजिस्ट्रीवर अंगठा लावण्यास नकार दिला. हिराबाईने अंगठा लावण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या नानासाहेबाने हिराबाईचे नाक – तोंड उशीने दाबले. आदिनाथ नानासाहेब काकडे (२३) ने हात – पाय धरले, तर पांडुरंग देविदास काकडे (२४) याने खरेदी खताच्या कागदपत्रावर डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे बळजबरीने मारून घेतले.

या प्रकारामुळे हिराबाई बेशुध्द झाली. हिराबाई बेशुद्ध पडल्यानंतर देखील पांडुरंगने त्यांना रिक्षातून धानोरा येथील घरी आणून सोडले. हिराबाईची तडफड पाहून त्यांची मुलगी अलकाबाई रावसाहेब पवार यांनी सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे हिराबाईला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान, हिराबाईचा मृत्यू झाला. अलकाबाई पवार यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि ३०२ १२०, (ब), ३४ कलमान्वे नानासाहेब, आदिनाथ आणि पांडुरंग या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये अलकाबाई पवार आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने तिघांना सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी कलम ३०४ (दोन) सहा वर्षे सक्तजमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

आपली प्रतिक्रिया द्या