जेष्ठ नागरीक सहा महिने ‘ओळखपत्रां’च्या प्रतीक्षेत

 सामना ऑनलाईन । मालवण
मालवण तहसील कार्यालयात तालुक्यातील जेष्ठ नागरिकांची ओळखपत्रे बनविण्यासाठी सहा महिन्यापूर्वी अर्ज करण्यत आले होते. मात्र अद्याप कार्यवाई झाली नाही. तरी येत्या दोन दिवसात जेष्ठ नागरिकांना ओळखपत्रे न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोंडकर यांनी सोमवारी दिला आहे.
दरम्यान, तहसील प्रशासन ढिसाळ कारभार करत आहे. ओळखपत्र देण्याबाबत सहा महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही असे सांगत सोमवारी  मोंडकर यांनी नायब तहसीलदार धनश्री भालाचीम यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी काही जेष्ठ नागरिक यांनी तहसील कार्यालयाकडून जेष्ठ नागरिक ओळखपत्र मिळण्यास विलंब होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
ओळखपत्रे मिळण्यासाठी तहसीलकार्यालयाशी पाठपुरावा केला असता  वेळोवेळी तांत्रिक कारण पुढे करुन प्रशासन बाजू मारुन नेत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास  जेष्ठ नागरिकांच्या वतीने न्यायासाठी भिक मांगो आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आप्पा लुडबे, भाऊ सामंत, यांच्यासह दिलीप सावजी,आबा शिर्सेकर, प्रवीण हडकर, रत्नप्रभा चोपडेकर, रवी मयेकर, महेश चव्हाण, रमेश कीर्तने यांच्यासह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
आपली प्रतिक्रिया द्या