‘प्रेमाचा’ चहा महागात पडला, लग्नाळू वृद्धाकडून 1 कोटी घेऊन भलत्याशीच लग्न केले

मुंबईतल्या 73 वर्षांच्या वृद्धाला 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घालण्यात आला आहे. ही व्यक्ती वित्तपुरवठा कंपनीसाठी कलेक्शन एजंट म्हणून काम करते. जेरॉन डिसूझा असं या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. ज्या महिलेने या वृद्धाला फसवलं आहे तिने त्याला लग्न करण्याचे आश्वासन दिलं होतं. लग्नानंतर मी तुझी उतारवयात काळजीही घेईन असंही तिने जेरॉनला सांगितलं होतं. तिच्या आश्वासनावर विश्वास ठेवत जेरॉनने भामटीच्या नावावर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती.

जेरॉनची शालिनी सिंहशी ओळख 2018 साली झाली होती. वांद्रेतील एका हॉटेलमध्ये दोघे भेटले होते. दोघांनी तिथे चहा घेतला आणि त्यानंतर जेरॉनने शालिनीच्या खात्यात रक्कम जमा केली होती. शालिनीने जेरॉनला लग्नाचं आश्वासन देत वेळोवेळी झुलवत ठेवलं होतं. अचानक शालिनी बेपत्ता झाल्याने जेरॉन बेचैन झाले होते. शालिनी ही एका खासगी बँकेमध्ये ग्राहक समस्या निवारण केंद्रात ( कस्टमर केअर ) कामाला होती. ती बेपत्ता झाल्यानंतर जेरॉन यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती.

पोलिसांना काही दिवसांपूर्वी कळाले होते की लॉकडाऊनच्या काळात शालिनी तिच्याकडे असलेले सगळे पैसे घेऊन फरार झाली होती. गावाला गेल्यानंतर तिने दिनेश सिंह याच्याशी लग्न केले होते. हे पोलिसांना कळाल्यानंतर जेरॉन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शालिनीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शालिनीसोबत दिनेशचेही नाव आहे. ज्येष्ठ नागरिकाला फसवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या