चुकलेल्या विमानाची गोष्ट…!

ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे सांगत आहेत त्यांच्या आयुष्यात घडलेला अविस्मरणीय प्रसंग…

सन 2010मध्ये अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन अमेरिकेला झाले. त्या वेळी नाटय़ परिषदेने इथून बऱयाच कलावंतांना आमंत्रित केले होते. राजा-राणी ट्रव्हल्सतर्फे हा दौरा अमेरिकेत करण्यात आला. संमेलनाचा दोन दिवसांचा सोहळा उत्तम पार पडला. त्याच्यानंतर आठ दिवस अमेरिकेतल्या काही भागांमध्ये फिरण्यासाठी आम्ही निघालो. फिलाडेल्फियापासून पुढे नायगारापर्यंत जाऊन आम्ही न्यूयॉर्कला परतलो. तिथून मुंबईला परतण्यासाठी आमची तिकिटे होती.

दुपारी दोन वाजता सगळय़ांनी बसमध्ये बसायचे ठरले होते. मी त्या हॉटेलमधून निघालो. तिथे माझा जाहिरात क्षेत्रातला मित्र राज कांबळे आला होता. मी त्याला भेटत होतो आणि बस सुटायचीही वेळ झाली होती. मी त्याचा निरोप घेऊन धावतपळत बसमध्ये बसलो. ती बस न्यूयॉर्क एअरपोर्टवर पोहोचली. एअरपोर्टवर मोहन जोशी, कुमार सोहोनी असे आम्ही एकत्र रांगेत उभे होतो. सहज आम्ही तिकिटावर नजर मारली तेव्हा आम्हाला समजले की, ते न्यूयॉर्क एअरपोर्ट नव्हे, तर नेवार्क एअरपोर्टचे ते तिकीट होते. हे पाहिल्यावर माझ्या छातीचा ठोकाच चुकला. साहजिकच आमची नेवार्कला जाण्यासाठी धावपळ उडाली. मी तसाच माझी बॅग घेऊन बाहेर आलो, टॅक्सी पकडली. हातात वेळ फार कमी होता. जेमतेम तासाभरात तिथे पोहोचून सगळय़ा गोष्टी कराव्या लागणार होत्या.

ट्रफिकमधून त्याने टॅक्सी फूलस्पीडने काढली. त्याला मी माझ्या इंग्लिशमध्ये कसेबसे ‘एक्सप्लेन’ करत होतो. माझे इंग्लिशमधले सरळ आणि ‘शुद्ध तुपातले कॉन्व्हर्सेशन’ सुरू होते. त्याची भाषाही मला कळत नव्हती. कसेबसे आम्ही नेवार्कला पोहोचलो. काऊंटरवर आल्यावर मला सांगण्यात आले की, ‘विमानाचे दरवाजे आता बंद झाले आहेत आणि तुम्ही आता विमानात जाऊ शकत नाही.’ हे ऐकल्यावर मला काय करावे ते कळेना. तेवढय़ात राजा-राणी ट्रव्हल्सचे व्यवस्थापक समोरून आले. त्यांना पाहताच माझ्या जिवात जीव आला. त्यांना मी घडलेली गोष्ट सांगितली. त्यांनी तर कपाळावर हातच मारला. ‘मी न्यूयॉर्क आणि नेवार्कमध्ये फसलो,’ असे त्यांना सांगितले. त्यांनी काहीतरी प्रयत्न करून बघितला. शेवटी ते म्हणाले, ‘उद्या दुपारचे मुंबईपर्यंतचे डायरेक्ट विमान आम्ही आता शिफ्ट केलेले आहे, तर प्लीज तुम्ही उद्या या,’ पण इथे गडबड अशी होती की, आता राहायचे कुठे? मला त्या वेळी राज कांबळेची आठवण आली. मी राज कांबळेला फोन केला. तो तिथल्या जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करत होता. त्याने मला त्याच्या घरी बोलावले. मी त्याच्या घरी जेवण वगैरे केले. तिथे मी थोडा रिलॅक्स झालो. निघण्याच्या वेळी त्याने मला टॅक्सीत बसवून दिले. मी एअरपोर्टवर पोहोचलो आणि विमानात बसलो. अशा तऱहेने एका चुकलेल्या विमानातून आणि एका डायरेक्ट फ्लाइटमधून मी मुंबईला पोहोचलो. थोडा वेंधळेपणा, माझ्याकडून झालेले दुर्लक्ष, मोहन जोशी आणि राज कांबळेने आयत्या वेळी केलेली मदत, यामुळे आणि ट्रव्हल्सच्या व्यवस्थापकांचे सहाय्य या सगळय़ा गोष्टींमुळे मी सुखरूप पुन्हा हिंदुस्थानात पोहोचलो.

परदेशात जाण्याच्या विचाराने माझ्या अंगावर जो काटा येतो, तो या एका गोष्टीमुळे येतो. कारण आपल्याकडे एखादे विमान चुकले, एखादी ट्रेन चुकली, बस चुकली तर तितके टेन्शन येत नाही, जितके परदेशात येते. परदेशात विमान चुकणे, एक रात्र तिथे काढणे, ही टेन्शन येणारी बाब आहे. सुदैवाने ट्रव्हल्सच्या व्यवस्थापकांनी माझी छान काळजी घेतली, मित्रांनी मदत केली. तिथे कुणालाच कळलेले नव्हते की मी कुठे आहे, काय करतोय वगैरे. मुंबईत आल्यानंतर सगळी सारवासारव झाली आणि सगळय़ांना काय घडले ते समजले. असा एक ‘दिल धक धक करनेवाला’ अविस्मरणीय प्रसंग माझ्या आयुष्यात घडलेला आहे.

शब्दांकन – राज चिंचणकर