ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला, मुलांसाठी सेवाकार्य उभ्या करणाऱया समाजसेविका शोभना रानडे (99) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने 2011 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने गौरव केला होता.
शोभना रानडे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1924 रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले. रानडे यांचे जीवन निराधार स्त्रिया आणि बालकांसाठी समर्पित होते.
आसाममधील उत्तर लखीमपूर येथे 1955 मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 1979 मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेस येथे असलेल्या गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आणि प्रशिक्षणासाठी एक संस्था स्थापन करण्यात मदत केली.
गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या नेतृत्वाखाली रानडे यांनी 1998 मध्ये कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय ही निराधार महिलांसाठी एक संस्था सुरू केली. कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी याशिवाय अनेक संस्थांवर त्या अध्यक्ष होत्या.