
आयुष्यभर नोकरी केल्यानंतर माणसू शांत बसत नाही. नोकरीतून निवृत्त झाले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना काम करायची इच्छा आहे. शक्य असेल तोपर्यंत काम करायचे आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम राहायचे आहे. सुमारे 40 टक्के वृद्धांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. ‘हेल्पएज इंडिया’च्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
15 जून रोजी जागतिक वृद्ध अत्याचार जागरुकता दिन होता. याचे औचित्य साधून वृद्धांना समाजात तसेच कुटुंबात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याबाबतचे सर्वेक्षण ‘हेल्पएज इंडिया’तर्फे करण्यात आले. ‘ब्रिज द गॅप – ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजूया’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी डॉ. निर्मला सामंत-प्रभावळकर, डॉ. मिकी मेहता, प्रकाश बोरगावकर उपस्थित होते.
आर्थिकदृष्टय़ा कुटुंबावर अवलंबून
राष्ट्रीय स्तरावर 47 टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्टय़ा कुटुंबावर अवलंबून असतात. आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित वाटत नसल्याचे 40 टक्के वृद्धांनी सांगितले. निवृत्तीवेतन पुरेसे नसल्याचे कारण 45 टक्के वृद्धांनी दिले. मुंबईत 72 टक्के ज्येष्ठ कुटुंबावर अवलंबून आहेत, तर 16 टक्के निवृत्तीवेतन आणि आर्थिक मदतीवर आहेत. मुंबईत 58 टक्के वृद्धांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे उत्पन्न पुरेसे आहे, तर 42 टक्के वृद्धांना आपले उत्पन्न अपुरे असल्याचे जाणवत आहे.
शक्य असेल तोपर्यंत…
‘हेल्पएज इंडिया’च्या सर्वेक्षणात 22 शहरांतील 4399 वृद्ध सहभागी झाले. सर्वेक्षणानुसार, 71 टक्के वृद्ध सध्या काही काम करत नाहीत, तर 36 टक्के वृद्धांना अजून काम करण्याची इच्छा आहे. 40 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी सेवानिवृत्तीची मर्यादा ओलांडून ‘शक्य असेल तोपर्यंत’ काम करायचे असल्याचे सांगितले. मुंबईतील 26 टक्के वृद्ध निवृत्तीनंतरदेखील काम करण्यास इच्छुक आहेत.