‘साहेबांना घरी सोडले’, सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा रुग्णवाहिकेचा टॅक्सीसारखा वापर

1360

सेंट जॉर्ज इस्पितळाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी रुग्णलयांच्या रुग्णवाहिकांचा वापर टॅक्सीसारखा केला आहे. मीटींगमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजासाठी आपण तसे केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मुंबई मिररने या बाबत वृत्त दिले आहे. डॉ. मधुकर गायकवाड हे मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज इस्पितळात अधीक्षक पदावर आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 350 वेळा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर टॅक्सीसारखा केला आहे. 90 वेळा त्यांनी रुग्णवाहिकेचा वापर हा कार्यालयीन कामासाठी केला आहे. तर खासगी कामासाठी 250 वेळा रुग्णवाहिकेचा वापर केला आहे.

या प्रकरणी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बर्‍याचवेळा मला ऐनवेळी मीटिंगसाठी जावे लागतं. त्यावेळी मुंबईच्या ट्रॅफिकमुळे उशीर होतो. तेव्हा रुग्णालयाचा पर्याय चांगला होता. रुग्णवाहिकेने गेल्यामुळे इतर चालक जागा देतात आणि वेळेची बचत होते असे कारण त्यांनी दिले.

रुग्णसेवेसाठी या रुग्णवाहिका नसून अधीक्षकांनी फिरण्यासाठी या रुग्णवाहिका वापरल्या आहेत. रुग्णालयाच्या नोंदवहीत चालकांनी अधीक्षकांच्या रुग्णालय वार्‍यांची नोंद केली आहे. अधीक्षक साहेबांना घरी सोडले, अधीक्षक साहेबांना कोर्टात घेऊन गेलो आणि आलो, अधीक्षक साहेबांना जे जे हॉस्पिटलच्या मीटींगमध्ये घेऊन गेलो आणि आलो, असे नोंदवहीत नमूद करण्यात आले आहे. अधीक्षकांसाठी चार रुग्णवाहिका वापरण्यात आल्या. त्यापैकी दोन रुग्णवाहिका सामाजिक संस्थांनी रुग्णालयाला दान केल्या आहेत.

अशा प्रकारे रुग्णालयांचा वापर करणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक तात्याराव लहाने यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून चालवण्यात येणार्‍या रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांना प्रवास भत्ता दिला जातो. डॉ. गायकवाड यांनी रुग्णालयांचा वापर करून हा प्रवास भत्ता घेतला का याचा तपास केला जाईल असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी या प्रकरणाचे कागदपत्र माध्यमांसमोर आणले. पूर्वी गँगस्टर पळून जाण्यासाठी अशा प्रकारचे रुग्णावाहिकेचा वापर करायचे अशी प्रतिक्रिया गुरव यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या