दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा; इंस्टाग्रामवर पोस्ट

दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती तिने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. जीवनात एक क्षण असा येतो की आपल्याला वेगळ्या दिशेने पुढे जाण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय घेणे खूप कठीण असते. आपण ज्या गोष्टीचा आनंद घेतअसतो, त्यापासून दूर जावे लागते, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सेरेना विल्यम्स 40 वर्षांची असून टेनिसमधील अव्वल मानांकित खेळाडू आहे. मात्र, आता तिने टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. आपण टेनिसचा आनंद घेतला आहे. मात्र, आता आपली कौटुंबिक जबाबदारी आणि अध्यात्मातील गोडी जपण्यासह इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे. आता आणखी काही आठवडे आपण टेनिस खेळणार असून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

सेरेनाने यूएस ओपनमध्ये शानदार प्रदर्शन करत आपल्या कारकिर्दीत एकूण 6 वेळा हा चषक जिंकला आहे. 1999, 2002, 2008, 2012, 2013 आणि 2014 मध्ये तिने यूएस ओपनवर आपले नाव कोरले. तसेच ती कारकिर्दीत 23 वेळा ग्लँड स्लॅम विजेती ठरली आहे. गेल्या काही काळापासून ती दुखापतीमुळे त्रस्त आहे. तसेच सध्या तिला सूर गवसत नाही. ती पूर्वीसारखा धमाकेदार खेळ करत नसल्याने तिच्या निवृत्तीची चर्चा होत होती. आता तिनेच टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.