सेरेना मुलीसोबत टेनिसकोर्टवर उतरली, अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅमसाठी रेडी

989

जगामध्ये अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत 23 वेळा चॅम्पियन ठरलेल्या सेरेना विल्यम्सने आपण आगामी मोसमासाठी सज्ज होत असल्याचे शनिवारी दाखवून दिले. याप्रसंगी महान टेनिसपटूने आपली मुलगी ‘ऑलिम्पिया’ हिच्यासोबतचा टेनिसकोर्टवरील फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. यानंतर सेरेना आता बहीण व्हीनससोबत दुहेरीत खेळणार नसून तिला नवीन पार्टनर मिळालीय, अशाप्रकारचे कमेण्टही यावेळी सोशल साईटवर करण्यात आले.

सेरेना विल्यम्स फेब्रुवारी महिन्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे अद्याप ती टेनिसकोर्टपासून दूरच आहे. ऑगस्ट महिन्यापासून टेनिसच्या मोसमाला सुरुवात होणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत खेळण्याची इच्छा तिने याप्रसंगी व्यक्त केली.

टेनिस असोसिएशनचे कडक नियम
यूएस टेनिस असोसिएशनने आगामी अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेसाठी कडक नियम बनवले आहेत. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था मॅनहटन येथील एअरपोर्टनजीकच्या हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच एका रूममध्ये एकालाच राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करायचीय
सेरेना विल्यम्स हिने 2017 साली अखेरचे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिला अद्याप ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्यासाठी तिला आता अवघ्या एका ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची गरज आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेत ती सहभागी झाल्यास ही स्पर्धा जिंकण्यासाठी सेरेना विल्यम्स सर्वस्व पणाला लावेल.

आपली प्रतिक्रिया द्या