आठ बॉम्बस्फोटांनी कोलंबो हादरले; 215 ठार,500 जखमी

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत आत्मघाती हल्लेखोरांनी नरसंहार घडवून आणला. चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्सना निशाणा बनवून लागोपाठ आठ धमाके करण्यात आले. या भयंकर स्फोटांत जवळपास 215 जण ठार तर 500 जखमी झाले. मृतांमध्ये 35 परदेशी पर्यटक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली असून सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. जगभरातून या बॉम्बस्फोटांचा निषेध होत आहे. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतलेली नाही. दरम्यान, या स्फोट प्रकरणात श्रीलंकन पोलिसांनी आतापर्यंत सातजणांना ताब्यात घेतले आहे.

कोलंबो शहरात ईस्टर संडेच्या निमित्ताने सेंट ऍन्थनी चर्चमध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच भयंकर धमाका झाला. स्फोट होताच एकच हाहाकार उडाला. चर्चमध्ये रक्तामांसाचा चिखल झाला. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळू लागले. लगेचच नौगोंबो शहरातील सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये धमाका झाल्याचे वृत्त आले. या चर्चमध्येही ईस्टर संडेची प्रार्थना चालू होती. स्फोटांच्या दोन घटनांनी देश हादरून गेला असतानाच बट्टीकलोबा शहरातील चर्चही स्फोटात उडवून देण्याची बातमी आली. याशिवाय शांग्रिला, सिनामोन ग्रँड आणि किंग्जबरी या पंचतारांकित हॉटेल्समध्येही आत्मघाती हल्ला करण्यात आला. दुपारी दोन धमाके झाले. लागोपाठ झालेल्या आठ स्फोटांमध्ये जवळपास 215 जण ठार झाले असून शेकडो जखमी झाल्याचे श्रीलंकेचे अर्थमंत्री हर्षा डिसिल्वा यांनी सांगितले. मृतांमध्ये 35 जण परदेशी पर्यटक असून त्यांचे नागरिकत्व कळले नसल्याचे ते म्हणाले.

लागोपाठ झालेल्या आठ बॉम्बस्फोटांच्या घटनेमुळे श्रीलंकन सरकार हादरून गेले. देशभरात तत्काळ संचारबंदी लागू करण्यात आली. दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असून रात्रीच्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली असून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी यांच्याकडून निषेध

हिंदुस्थानचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हिंसेला समाजात कोणतेही स्थान नसल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. संकटाच्या या काळात हिंदुस्थान श्रीलंकेच्या पाठीशी भक्कम उभा असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याशी तत्काळ फोनवरून बातचित केली. हिंदुस्थान श्रीलंकेसोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

परराष्ट्र मंत्रालय दूतावासाच्या संपर्कात

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून श्रीलंकेतील घटनांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. कोलंबो येथे असलेल्या दूतावासाशी आपण संपर्कात असून श्रीलंकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ हेल्पलाइन उघडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

घातपाताचा इतिहास

1990 मध्ये लिट्टेने पूर्व प्रांतात हल्ला करून 750 पोलिसांचा नरसंहार केला होता. लिट्टेने या पोलिसांचे अपहरण करून नंतर त्यांना गोळय़ा घातल्या. हा जगातील सर्वात भयानक नरसंहार होता. 1996 मध्ये एका कॅम्पमध्ये घातपात घडवून 200 जणांचा बळी घेण्यात आला. बट्टीकलोवा, अनुराधापूर येथेही असाच नरसंहार करून शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेण्यात आला. गृहयुद्धापासून आता कुठे श्रीलंकेला उसंत मिळाली असतानाच साखळी बॉम्बस्फोट झाले.   

हल्लेखोराने स्वतःला उडवले

लागोपाठ झालेल्या सहा बॉम्बस्फोटानी काळीज गोठून गेले असतानाच सातवा स्फोट एका घरात झाला. आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. त्यापाठोपाठ लगेच दुपारी तीन वाजता पोलीस कर्मचारी एका इमारतीत चौकशीसाठी घुसताच अतिरेक्यांनी या ठिकाणी भयंकर धमाका घडवून आणला. यात तीन पोलीस ठार झाले.

हिंदुस्थानी दूतावासही निशाण्यावर होता

चर्चवर हल्ला करणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली असून हा हल्लेखोर कोलंबोतील हिंदुस्थानी दूतावासावरही हल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.

 पोलीसप्रमुखांनी इशारा दिला होता

देशातील चर्च आणि पंचतारांकित हॉटेल्सना अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा श्रीलंकेच्या पोलीसप्रमुखांनी दहा दिवसांपूर्वीच दिला होता. ईस्टर संडे निशाण्यावर असल्याचेही सांगितले होते, मात्र हा इशारा गांभीर्याने घेतला गेला नाही.

श्रीलंकन सरकारची आपत्कालीन बैठक

साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकन सरकारने तातडीने आपत्कालीन बैठक घेऊन जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी घटनेचा निषेध करतानाच श्रीलंकन जनतेला या संकटाचा धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनीही जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

इथे झाले साखळी स्फोट

  • सेंट ऍन्थनी चर्च, कोलंबो
  • सेंट सॅबेस्टियन चर्च,  नौगोंबो
  • झिओन चर्च, बट्टीकोलबा
  • हॉटेल शांग्रिला
  • हॉटेल सिनामोन ग्रँड
  • हॉटेल किंग्जबरी
  • कोलंबो झू जवळ
  • दक्षिण कोलंबोतील  एका घरात