भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघाताची मालिका सुरूच; घाट उतरणाऱ्या कंटेनरला अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भोस्ते घाटातील अवघड वाळणवर अपघातांची मालिका अद्याप सुरूच आहे. घाट उतरणाऱ्या कंटेनरचालकाचा ताबा सुटल्याने शुक्रवारी कंटेनर घाटात उलटला. या अपघातात सुदैवानी मनुष्यहानी टाळली असली तरी वित्तहानी झाली आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून भोस्ते घाटातील हे वळण अवजड वाहनांच्या चालकांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यात या ठिकाणी अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये काहींचे बळी गेले आहेत. तर काही गंभीर जखमी झाले आहेत.

चौपदरीकरणाचे काम करताना वळणाचे काम योग्य प्रकारे न झाल्याने या वळणात अपघात होऊ लागल्याने ठेकेदाराने या वळणार तीन स्पीड ब्रेकर्स टाकले, अपघातांना आळा बसावा हा त्यामागील उद्देश असावा. मात्र स्पीड ब्रेकर्स टाकल्यापासून अपघातांना आळा बसण्याऐवजी अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भोसे घाटात ठेकेदाराने केलेले काम हे अतिशय बेजाबदारपणे केले असल्याने या मार्गावर चौपदरीकरणानंतर अपघातांमध्ये वध झाल्याचा आरोप वाहनचालक आणि प्रवासी करत आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केले आहे. मात्र हे काम करताना अनेक त्रुटीं राहिली असल्याने चौपदरीकरणानंतर अपघाताची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भोस्ते घाटातील एका अवघड वळणावर तर गेल्या सहा महिन्यात अनेक जीवघेणे अपघत झाले आहेत. या अपघातांना केवळ ठेकेदार जबादार आहे. ठेकेदाराने वळणाचे काम योग्य प्रकारे न केल्याने घाट उतरणाऱ्या जड वाहनांचा या ठिकाणी अपघात होत आहे.

चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन काँक्रीट रोड वाहतुकीस खुला केल्यावर या वळणावर लागोपाठ पाच ते सहा अपघात झाले. यामध्ये एका ट्रक चालकाचा बळी गेला. घाटातील वळणावर अपघाताची मालिका सुरु झाल्यावर माध्यमांनी ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून उतारावरील वाळणवर तीन मोठमोठे गतिरोधक टाकण्यात आले. घाट उतरणाऱ्या वाहनाचा गतिरोधकामुळे स्पीड कमी व्हावा या त्या मागील उद्देश असावा मात्र झाले उलटेच. रात्रीच्या वेळेत वेगात घाट उतरणाऱ्या जड वाहनांच्या चालकांना गतिरोधक दिसतच नसल्याने गतिरोधकावर आदळून जड वाहनांचे अपघात होऊ लागले. गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी अनेक जड वाहनांचे अपघात झाले आहे. मात्र अपघात रोखण्यासाठी बांधकाम विभागाकडून काहीच उपाय योजना केली गेलेली नाही.