कश्मीर खोऱयात राहुल गांधींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी! पोलीस गायब, ‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरता ब्रेक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने कश्मीर खोऱयात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. कडाक्याच्या थंडीतही यात्रेच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली. मात्र बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीसच नव्हते. जम्मू-कश्मीरचे पोलीस ऐनवेळी कुठे गायब झाले? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव ‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरता ब्रेक लागला आहे.

कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतीम टप्प्यात आहे. तब्बल 3570 किलो मीटरच्या पायी प्रवास करून 30 जानेवारीला श्रीनगर येथे तिरंगा फडकवून यात्रेचा सांगता होणार आहे. आज सकाळी जम्मू विभागातील बानीहाल येथून ही यात्रा निघाली. राहुल गांधींबरोबर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे यात्रेत सहभागी झाले.  जवाहर टनेलमधून यात्रेने कश्मीर खोऱयात काझीगुंड येथे प्रवेश केला. मात्र जवाहर टनेल ओलांडून 500 मीटरवरच राहुल गांधी यांना थांबावे लागले.

गर्दीवर नियंत्रण ठेवणे, नियोजन करणे हे पोलिसांचे काम होते. पण मला जम्मू-कश्मीर पोलीस हे करताना कुठे दिसले नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव मला यात्रा आज थांबवावी लागली. सुरक्षा टीमने मला सुरक्षेच्या कारणास्तव सूचना केल्या. सुरक्षेत काय त्रुटी झाल्या माहीत नाही, पण उद्या हे असे होऊ नये.
राहुल गांधी

भारत जोडो यात्रेच्या बाहेरील सुरक्षा कवचची जबाबदारी जम्मू-कश्मीर पोलिसांवर आहे. परंतु राहुल गांधी यांनी चालायला सुरुवात करताच काही मिनिटातच हे पोलिसांचे कवच गायब झाले. मी याचा साक्षीदार आहे.
ओमर अब्दुल्ला