नीट परीक्षेतील घोळामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेची विश्वासार्हता आणि नीट परीक्षेची रचना आणि व्यवस्थापन करण्याच्या पद्धती याबाबत एकूणच ‘गंभीर प्रश्न’ निर्माण झाले आहेत, असा आरोप आज काँग्रेसने केला.
संसदेच्या नवीन स्थायी समित्या स्थापन केल्या जातील तेव्हा नीट, एनटीए आणि एनसीईआरटी या सर्वांचाच नीट सखोल आढावा घेतला जाईल अशी आशा काँग्रेसने व्यक्त केली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लावणाऱ्या या परीक्षेतील घोळाबाबत पंतप्रधानांनी मौन सोडावे, अशी मागणीही काँग्रेसने केली.
30 लाखांचे 6 धनादेश बिहारमध्ये मिळाले
नीट परीक्षेतील गडबड घोटाळय़ाचा तपास करणाऱ्या बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सहा धनादेश जप्त केले आहेत. नीट परीक्षेचा पेपर मागणाऱ्या उमेदवारांनी कथितपणे 30 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मागणाऱ्या माफियांसाठी हे पोस्ट डेटेड धनादेश जारी केल्याचा संशय आहे. संबंधित बँकांकडून खातेदारांबद्दल तपशील तपास यंत्रणा पडताळत असून, आतापर्यंत बिहारमधील चार परीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह 13 जणांना अटक केली असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
नीट परीक्षेत भेदभाव होत असल्याची शंका
नीटमुळे सीबीएसई विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी भीती तामीळनाडूतील काही खासदारांनी यापूर्वी व्यक्त केली होती. या मुद्दय़ाचा व्यवस्थित अभ्यास व्हायला हवा. नीट परीक्षेमुळे भेदभाव होतो का, गरीब विद्यार्थ्यांच्या संधी डावलल्या जातात का, या सगळय़ाचा अभ्यास व्हायला हवा, असे म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रानेही नीटबद्दल गंभीर शंका व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनसीईआरटीनेही गेल्या दशकभरात सर्व व्यावसायिकता गमावली असल्याचा दावा रमेश यांनी केला.