ब्रेकिंग – ‘सिरम’मधील आगीत होरपळून 5 जणांचा मृत्यू, महापौरांची माहिती

सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील प्लान्टमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसानही झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

गुरुवारी दुपारी सिरमच्या निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले.

या दरम्यान, आग लागलेल्या इमारतीतून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग विझवल्यानंतर इमारतीमध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आले, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

तसेच ज्या पाच लोकांचे मृतदेह सापडले ती सर्व निर्माणाधीन इमारतीत काम करणारे मजूर असावेत अशी शक्यता आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिगण्यांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या