आ. वैभव नाईक यांच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीस सुरूवात

109

सामना प्रतिनिधी । कुडाळ

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पणदूर ते कुडाळ काळपनाका दरम्यान सर्व्हिस रोडसह महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेची कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी महामार्ग अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व्हिस रोडसह हायवेच्या झालेल्या दुरावस्थेबाबत आ.वैभव नाईक यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व्हिस रस्त्यांवर तातडीने कार्पेट करण्याच्या सुचना दिल्या. आ. वैभव नाईक यांच्या दणक्याने हायवे अधिकारी शेख यांनी सर्व्हिस रोडची दुरुस्ती करण्याचे काम तात्काळ हाती घेत सायंकाळी पावशी येथे सर्व्हिस रस्त्यावर खडी पसरण्याचे काम सुरु केले आहे. लागलीच कार्पेटचेही कामही केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कुडाळ तालुक्यातील पणदूर, वेताळबांबर्डे, पावशी, कुडाळ येथे महामार्ग चौपदरीकरणांतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्यांवर खड्डे पडुन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून हे रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यांवर तात्काळ कार्पेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वैभव नाईक यांनी शुक्रवारी या सर्व्हिस रस्त्यांची अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. या रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत हायवे अधिकारी शेख व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांना धारेवर धरत तात्काळ कार्पेट करून रस्ता सुस्थितीत करावा तसेच आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सुचना आ. नाईक यांनी हायवे अधिकारी व ठेकेदार प्रशासनाला दिल्या. त्यानुसार हायवे अधिकारी शेख यांनी तातडीने मशीनरी व मटेरियल मागवून घेत आज सायंकाळपासून सर्व्हिस रोड सुस्थितीत करण्यास सुरवात केली आहे.

महामार्ग पाहणी वेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, पावशी उपसरपंच दिपक आंगणे, नगरसेवक सचिन काळप, राजु गवंडे, धीरेंद्र चव्हाण आदींसह पदधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे व सहकारी देखील उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या