भगवानगडावरील दसरा मेळाव्यास मनाई

27

सामना ऑनलाईन । भगवानगड

महाराष्ट्राच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवानगडावर दसरा मिळावा घेण्यास तहसीलदारांनी परवानगी नाकारली आहे. भगवानगड ट्रस्ट, खरवंडी तसेच भारजवाडी ग्रामपंचायत, महंत नामदेव शास्त्री यांनी दिलेल्या अभिप्रायांचा आधार घेत कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत तहसीलदार नामदेव पाटील यांनी मेळाव्यास परवानगी नाकारत असल्याचे पत्र पंकजा मुंडे समर्थकांना दिले आहे. दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतरही मेळावा भगवानगडावरच घेतला जाईल, असे पंकजा मुंडे यांचे समर्थक सांगत आहेत.

भाजपच्या तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी भगवानगडावर मेळावा घेण्याची परवानगी मागितली होती. पण तहसीलदरांनी परवानगी नाकारली आहे. महतं नामदेव शास्त्री यांनी ११ सप्टेंबर रोजी प्रशासनाला पत्र लिहून भगवानगडावर कोणत्याही राजकीय व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे येथे मेळावा घेऊ नये असा ठराव ट्रस्टने एकमताने घेतला आहे. मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिगंभीर होईल, असे पत्र महंत नामदेवशास्त्री यांनी प्रशासनाला दिले होते. तसेच गडावर मेळावा झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा पाथर्डी पोलिसांचाही अहवाल होता. त्या आधारावर तहसीलदारांनी मेळाव्याला परवानगी नाकारली.

पर्यायी जागेचा विचार सुरू

भगवानगडावर परवानगी मिळत नसेल तर भगवान बाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या गावात मेळावा घेण्याचा विचार पंकजा मुंडे यांचे समर्थक करत आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव हे भगवान बाबांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे सावरगाव येथे मेळावा घेण्याबाबत विचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या