ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यावरून भांडण झालं, पत्नीने मागितला तलाक !

लग्नापूर्वी नवऱ्याने दिलेले वचन लग्नानंतर पूर्ण केले नाही, म्हणून पत्नीने घटस्फोटाची मागणी करत न्यायालयात धाव घेतल्याची घटना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे घडली आहे. भोपाळ येथील अरेरा हिल्स येथे राहणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर ऑस्ट्रेलियातील आवडत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा लग्नापूर्वी नवऱ्याकडे व्यक्त केली होती.

नवऱ्यानेही तिची ही शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याचे वचन तिला दिले होते. मात्र लग्नानंतर तो तिला नेदरलँड किंवा जर्मनीमधील विद्यापीठात शिक्षणाकरिता जावे, असे सांगू लागला. याकरिता तो तिच्यावर दबावही आणत होता, अशी तक्रार या महिलेने भोपाळ येथील कुटुंब न्यायालयात केली आहे. तसेच आपले स्वप्न पूर्ण करू न शकणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्याला राहायचे नाही, असे सांगून भोपाळ कुटुंब न्यायालयात तिने घटस्फोटाची मागणी केली आहे.

दीड वर्षांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी तिच्या नवऱ्याने तिला तिची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता नवऱ्याने ऑस्ट्रेलियातील एका युनिव्हर्सिटीमध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्जही केला होता. पण प्रवेशावेळी घेण्यात आलेल्या चाचणीत पत्नी नापास झाली. त्यानंतरही ती परदेशातच शिकायला जायचे आहे, असा हट्ट नवऱ्याकडे करू लागली. तसेच दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून मला तुझ्याबरोबर राहायचे नाही, अशी मागणी करू लागली.

भोपाळ कुटुंब न्यायालयाकडून या दोघांचे समुपदेशन करण्यात आले. तेव्हा नवऱ्याने अशी माहिती दिली की, मी तिला समजावण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला, तरीही रागाने ती माहेरी निघून गेली आहे. तसेच काहीही न सांगता घटस्फोटाची मागणीही करत आहे. माझ्या ऐपतीनुसार दुसऱ्या देशात शिकण्याचे इतर पर्यायही तिला सांगितले, पण तिला ते आवडले नाहीत. माझी तिला घटस्फोट देण्याची इच्छा नाही. तसेच तिला परदेशात शिकायला पाठवण्याकरिता मला कोणतीही अडचण नाही त्याकरिता तिने अभ्यास करावा आणि प्रवेशाकरिता चाचणी द्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या