शेवभाजी न दिल्याने नवरा भडकला आणि घर सोडून गेला, पुढे काय झालं वाचा सविस्तर बातमी

प्रत्येक घरात नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच. मात्र काही वेळा भांडणांची कारणं ही फार विचित्र असतात. बायकोने शेवभाजी बनवून न दिल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने बायकोपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. सुखवस्तू घरातील या वृद्धाने बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात झोपडीमध्ये राहायला सुरुवात केली. या व्यक्तीने त्याच्या निवृत्ती वेतन खात्यातून पैसे काढायला सुरुवात केल्यानंतर त्याची बायको भडकली आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं.

घटना मध्य प्रदेशातील देवास इथली आहे. गंगाधर (बदललेले नाव) आणि सुनिता (बदललेले नाव) यांची वये अनुक्रमे 79 आणि 72 वर्षे अशी आहेत. गंगाधर हे बँकेत कामाला होते आणि ते सेवानिवृत्त झाले आहे. गंगाधर आणि सुनिता यांचा संसार आतापर्यंत सुरळित चालला होता. सेवानिवृत्तीनंतर मिळाले पैसे गंगाधर यांनी बायकोच्या नावावर खात्यात जमा केले होते. राहाते घरही त्यांनी बायकोच्या नावावर केले होते. काही दिवसांपूर्वी गंगाधर यांना शेवभाजी खायची इच्छा झाली. त्यांनी सुनिता यांना ती बनवायला सांगितली. सुनिता यांनी बाजारातून शेव आणून द्या म्हणून सांगितलं. गंगाधर यांनी शेव आणण्यासाठी सुनिता यांच्याकडे पैसे मागितले. नोकरीवर असताना पैसे मागत नव्हता मग आता कशाला मागताय असं सुनिता यांनी गंगाधर यांना म्हटले. यावर भडकलेल्या गंगाधर यांनी निवृत्तीनंतर मिळालेले सगळे पैसे तुझ्या नावावर खात्यात ठेवले आहेत, माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हटलं. यावरून दोघांत वाद झाला. सुनिता यांनी पैसे द्यायला आणि शेवभाजी बनवण्यास नकार दिला.

सुनिता यांच्यासोबत झालेल्या भांडणानंतर गंगाधर यांचं टाळकं सटकलं होतं. त्यांनी घर सोडलं आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात झोपडीमध्ये राहायला सुरुवात केली. गंगाधर यांनी निवृत्ती वेतन खात्यातून पैसे काढायला सुरुवात केली, ज्यामुळे सुनिता या देखील भडकल्या आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू नीटपणे ऐकून घेतल्या. यानंतर त्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून शेवेचं पाकीट मागवलं आणि सुनिता यांना त्याची भाजी करून गंगाधर यांना द्यायला सांगितली. या घटनेला 2 दिवस उलटल्यानंतर गंगाधर आणि सुनिता दोघे न्यायालयात आले आणि आम्ही एकत्र राहायला तयार असल्याचं सांगितलं. मात्र माझी बायको पुन्हा असं काही करणार नाही याची कशावरून खात्री देता येईल असा प्रश्न गंगाधर यांनी विचारला. जर बायको पुन्हा असं काही करणार नाही असं साईबाबांची शपथ घेऊन सांगणार असेल तर मी तयार आहे असं गंगाधर यांनी सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी या दोघांच्या शिर्डीला जाण्याची आर्थिक तरतूद करून दिली आणि दोघांना शिर्डीला पाठवले. शिर्डीवरून परत आल्यानंतर दोघांनी आपण एकत्र राहणार असल्याचं सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.

आपली प्रतिक्रिया द्या