वैभववाडीत चोरट्यांनी सात दुकाने फोडली

9

सामना प्रतिनिधी, वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोडी, दुकानफोडीचे सत्र सुरूच आहे. वैभववाडी बाजारपेठत एस.टी. स्टॅण्डसमोरील गौरव कॉम्लेक्समधील सात दुकानगाळे अज्ञात चोरट्यांनी फोडले. यातील तीन दुकानांतील १२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सुगावा लागल्याने चोरट्यांनी पलायन केले. रविवारी रात्रभर वीज नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. याबाबत दीपक सकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश राऊळ, पो.हे. कॉ. प्रमोद सुर्वे हे शहरात गस्त घालत होते. वैभववाडी एस.टी. स्टॅण्डसमोर आल्यानंतर त्यांना गौरव कॉम्लेक्समधून ठोकण्याचा आवाज आला. ते लगेचच गौरव कॉम्पलेक्सकडे जाण्यास निघाले. पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून चोर भातशेतीतून पळून जाण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी बॅटरीच्या उजेडात एडगाव तिठा, सांगुळवाडी रोड, खांबाळेदरम्यान चोरट्यांचा शोध घेतला. पण ते सापडले नाहीत.

दुकानावर असलेल्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी दुकान मालकांना याबाबत माहिती दिली. यावेळी गौरव कॉम्पलेक्समध्ये पाहणी केली असता तळमजल्यावरील पाच व वरच्या मजल्यावरील दोन दुकान गाळे फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यामध्ये प्रशांत कुळये यांचे श्री विमा सेवा केंद्र या ऑफिसमधील पाच हजार रुपये तसेच लक्ष्मी हेअर कटिंग सलूनचे मालक दीपक संकपाळ यांचे ४ हजार ५०० रुपये त्याचप्रमाणे अमरदीप वॉच कंपनीचे मालक प्रशांत सावंत यांच्या घड्याळ दुकानाच्या गोडाऊनमधून पाच घड्याळे व दोन किलो चहा पावडर असा एकूण १ हजार ७५० रुपयांचा माल आणि माऊली क्लॉथ सेंटरचे मालक दत्तात्रय नारकर यांच्या दुकानातील तीन हाफ पॅण्ट व तीन फुल शर्ट असा एकूण १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून पोबारा केला.

आपली प्रतिक्रिया द्या