सात हजार शिक्षकांना घरचा रस्ता? ‘शिक्षणशास्त्र’ डिप्लोमासाठी अर्जच केला नाही

24

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘शिक्षणशास्त्र’ या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्जच न करणाऱ्या राज्यातील सुमारे ७ हजार अप्रगत शिक्षकांना घरी बसावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रगत समजून त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. यंदा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची शेवटची संधी असून अर्ज करण्याची मुदत आज १५ सप्टेंबरला संपली.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षणशास्त्र हा डिप्लोमा अभ्यासक्रम सक्तीचा केला असून हा अभ्यासक्रम पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात, अशा सूचनाही राज्यांतील शिक्षण विभागांना दिल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात काही दहावी ते पदवी उत्तीर्ण शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयाचा डिप्लोमा पूर्ण केलेला नाही अशा ७ हजार ३२४ शिक्षकांची यादी विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी जाहीर केली होती. सर्व शाळा आणि शिक्षकांना यंदा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

  • अप्रगत शिक्षकांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून ‘डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन’ (शिक्षणशास्त्र) हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.
  • २३ ऑक्टोबर २०१७ ते २६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान प्रशिक्षण वर्ग सुरू होणार असून शिक्षकांना दोन सत्रात सेवांतर्गत प्रशिक्षणही मिळणार आहे.
  • आतापर्यंत सुमारे २५० शिक्षकांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे. उर्वरित शिक्षकांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही अद्याप दिलेली नाही.

पत्राद्वारे प्रशिक्षण योजना बंद
अप्रगत शिक्षकांनी शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्याने राज्यात सध्या सुरू असलेली ‘पत्राद्वारे प्रशिक्षण योजना’ बंद करण्यासंबंधी शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश जारी केला आहे. मात्र यंदा या योजनेच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या शिक्षकांचे प्रवेश सुरू ठेवण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला अर्ज करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज रद्द करण्यात येतील, असे या अध्यादेशात स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या