ओबीसी आंदोलनाचा सातवा दिवस; लक्ष्मण हाके यांची प्रकृती आणखी खालावली

ओबीसी आरक्षण बचावसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांची प्रकृती आणखी खालावली असून त्यांना पक्षाघात होण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे. दरम्यान, आरक्षण म्हणजे रेशन वाटपाचा कार्यक्रम नसून कुणबी आणि मराठे हे कायदेशीरदृष्टय़ा वेगळे आहेत हे सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकारने ओबीसींचे काय म्हणणे आहे ते तरी ऐकून घ्यावे, असे प्रा. हाके म्हणाले.

वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ पवार बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा सातवा दिवस होता. संपूर्ण आठवडा उलटून गेला तरी सरकारने या उपोषणाकडे ढुंकूनही पाहिले नाही. चार दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे हे उपोषणकर्त्यांना भेटून गेले. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. सरकारच्या कोडगेपणाचा निषेध म्हणून दोन्ही उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला.

रक्तदाब वाढला, वजनही घटले
सरकार जोपर्यंत चर्चेला येत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही, अशी भूमिका प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ पवार यांनी घेतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या पथकाने आज दोघांचीही तपासणी केली. त्यात प्रा. हाके यांची प्रकृती कमालीची खालावल्याचे दिसून आले. त्यांचा रक्तदाब वाढला असून वजनही घटले आहे. रक्तदाब वाढल्याने त्यांना पक्षाघात, हृदयविकाराचा धोका असल्याचे डॉ. राजेंद्र पाटील म्हणाले. त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.