केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे थकवले, आरटीआय’मधून खुलासा

सामना प्रतिनिधी । वी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवस शिल्लक राहिले असताना नगरविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे थकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रीय मंत्री विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकारी बंगल्यांचे भाडे थकविल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने केंद्रीय नगरविकास खात्याला मागविलेल्या माहितीमधून हे उघडकीस आले.

नगरविकास विभागाच्या उत्तरात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनीही थकबाकी ठेवल्याचे सांगितले आहे. ही थकबाकी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तूंबाबत आहे. नक्वी आणि सिंह यांच्यावर प्रत्येकी 1.46 लाख आणि 3.18 लाख रुपयांची थकबाकी आहे.

आरटीआय कार्यकर्ते अजितकुमार सिंह यांनी नगरविकास खात्याकडे मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे किती थकविले याबाबत माहिती मागवली होती. त्यावर 26 एप्रिल रोजी ही माहिती देण्यात आली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीपर्यंत 53 हजार 276 रुपये, प्रकाश जावडेकर यांनी 86 हजार 923 रुपये थकबाकी ठेवली आहे.

संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांची सुमारे 3 लाख रुपये थकबाकी आहे तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 88 हजार 269 थकबाकी ठेवलेली आहे. मात्र गृहमंत्री राजनाथ सिंह, रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, गिरीराज सिंह, जयंत सिन्हा, बाबुल सुप्रियो, रविशंकर प्रसाद, हर्ष वर्धन, उमा भारती, स्मृती इराणी यांनी सर्व देणी दिली आहेत.