परळीतील माणिकनगर भागात तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची रहिवाशांची मागणी

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी वैजनाथ शहरातील माणिकनगर भागातील रहिवाशांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. परळी नगर परिषदेने या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी परळी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाळयाचे तीव्र चटके बसत असून नागरिकांना पिण्याचे पाणी दहा दिवसाला एकदा मिळत आहे. प्रभाग क्र.16 मध्ये पाण्याची भीषण टंचाई झालेली आहे. नगर परिषदेमार्फत होणारा पाणी पुरवठा दहा दिवसांनी एकदा होत आहे. तेही काहीवेळा पुरताच चालू असतो. कोणाला पाणी मिळते तर कोणाला नाही अशा परिस्थितीत नगर परिषदेच्या मार्फत चालू असलेले टँकर माणिकनगर भागात अजूनही आलेले नाही. यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

या भागात नगर परिषदेने तात्काळ टँकर उपलब्ध करून नागरिकांना पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर शिवसेनेचे शहर उपप्रमुख अभिजीत धाकपाडे, विजय दहिवाळ, ईश्वर राऊत, दत्ता म्हाळगी, बालाजी गर्जे, विजय जाधव, काशिनाथ भोयटे, सुरेश बनसोडे, अनिल निकम, गोविंद पुट्टावार, बंटी लिमकर, गिरीष धसकटे, किशोर पवार, शिवहार राऊत यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.