सांडपाण्यातून नंदनवन फुलविणारा स्टेशन मास्तर, सँडहर्स्ट रोड स्थानकात ‘सेल्फी पॉइंट’

मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांचे कार्यालय आणि परिसर सध्याच्या रूक्ष वातावरणात प्रवाशांना आल्हाददायक वाटत आहे. या स्थानकातील स्टेशन मास्तर कार्यालय आणि परिसर सध्या हिरवी झाडे आणि फुलांनी नटला असून त्याकडे पाहून प्रवाशांना ताजेतवाने वाटत आहे. या रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांनी कार्यालय आणि परिसरात अक्षरशः नंदनवनच फुलविले आहे.

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर विनायक शेवाळे यांनी टाकाऊ वस्तूंना नवीन स्वरूप देत त्यांचा वापर झाडेफुले लावण्यासाठी केला आहे. अनेक शोभेची झाडे आणि नवनवीन रोपटी स्थानक परिसरात लावल्यामुळे प्रवाशांना येथे एकप्रकारचा सेल्फी पॉइंटच निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. मध्य रेल्वेचे हे एकाच नावाचे परंतु मध्य (ग्राऊंड लेव्हल) आणि हार्बर (एलिवेटेड) अशा दोन्ही मार्गांना जोडणाऱ्या स्थानकात प्रवाशांची तसेच जे.जे. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची सतत वर्दळ असते.

टेरिटोरिअल आर्मीचे सैनिक

स्टेशनमास्तरच अशी शेवाळे यांची ओळख नसून ते हिंदुस्थानी सैन्यदलासाठी सेवाही बजावत असतात. ते टेरिटोरिअल आर्मीचे सदस्य असून सैन्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी प्रत्येक वर्षातील काही महिने ऑन फिल्ड जाऊन देशसेवाही करतात.

मायक्रो टनेलिंगच्या मातीतून बगिचा

मध्य रेल्वेच्या मार्गिकेवरील ‘सँडहर्स्ट रोड’ या जमिनीवरील स्थानकाच्या ठिकाणी रेल्वेच्या भिंतीपलीकडून नेहमी कचरा आणि सांडपाणी सोडले जात होते. ही जागा स्वच्छ करीत त्यांनी पावसाळय़ात पाणी साचू नये म्हणून मायक्रो टनेलिंगचे काम होत असताना तेथील माती आणून येथे छोटा बगिचा तयार केला आहे. तसेच लीलीच्या आणि इतर झाडांची रोपटी मुंबई महानगरपालिकेकडून आणून येथील सांडपाण्यावरच आता ही रोपटी चांगली मोठी वाढली असल्याची माहिती स्टेशन मास्तर शेवाळे यांनी दिली आहे.

फुलझाडे लावण्यासाठी त्यांनी जुन्या टाकाऊ वस्तू ज्यात टमरेल, आरपीएफ जवानांच्या टोप्या आणि पाईपचे तुकडे यांना रंग लावून त्यांचा पुंडय़ाप्रमाणे वापर केला आहे. याशिवाय येथे दररोज फलकावर सुविचार लिहून त्याद्वारे जनप्रबोधन करण्याचाही प्रयत्न शेवाळे करीत असतात. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात आजूबाजूच्या रहिवाशांनी कचरा टाकू नये यासाठी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने जनप्रबोधन प्रचारफेरीही काढीत असतात.