एकीचा विनयभंग केल्यानंतर काही मिनिटांत दुसरीवर बलात्काराचा प्रयत्न, विलगीकरण संस्थेत विकृताचा हैदोस

1598

बंगळुरूमध्ये एचएसआर लेआऊट नावाचा परिसर आहे. इथे एक सरकारी हॉस्टेल असून या हॉस्टेलचा उपयोग सध्या विलगीकरण संस्था म्हणून करण्यात येत आहे. या हॉस्टेलमध्ये एका लिंगपिसाट विकृताने हैदोस घातला होता. हा प्रकार शुक्रवारी घडला असून दोन महिलांना या विकृताने त्याचे लक्ष्य बनविले होते.

लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर रेल्वेप्रवासाला देशात सुरुवात झाली आहे. बंगळुरू शहरात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलनीकरणात ठेवले जात आहे. गुरुवारी बंगळुरूला पोहोचलेल्या काही प्रवाशांना हॉस्टेलमध्ये विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इथे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार होते. या विलगीकरण कक्षामध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये नाहीयेत. समांथा (नाव बदललेले) नावाची एक तरूणी सकाळी 7.15 मिनिटांनी शौचालयाकडे जात होती. यावेळी अचानक एक माणूस आला आणि त्याच्या शरिराला नको तिथे स्पर्श केला. संतापलेल्या समांथाने या विकृताला गुद्दा मारला, यावर त्याने कान धरून तिची माफी मागितली. या प्रकारामुळे हादरलेली समांथा तिच्या खोलीमध्ये परतली, पूर्णपणे सावरायच्या आत त्यांच्या खोलीमध्ये तोच विकृत घुसला आणि त्याने समांथाच्या खोलीतील दुसऱ्या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने या तरुणीला जमिनीवर पाडून तिच्यावर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला.

हा विकृत तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून समांथा आणि खोलीतील इतर महिलांनी या लिंगपिसाट व्यक्तीला चोपण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नसल्याचं पाहून सगळ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. यावर त्या खोलीत बरेच जण जमले आणि त्यांनी या विकृताला खोलीतून बाहेर काढला. जयशंकर असं या आरोपीचं नाव असल्याचं वृत्त बंगलोर मिररने दिलं आहे. समांथा हिला कायद्याच्या शिक्षणासाठी नवी मुंबईतीली वाशी इथे यायचं होतं मात्र लॉकडाऊनमुळे तिने बंगळुरूतील तिच्या आजारी बहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरूला उतरल्यानंतर तिने अधिकाऱ्यांना विनंती केली होती की तिला घरामध्ये विलगीकरण करण्याची परवानगी मिळावी. ही परवानगी नाकारल्याने तिला नाईलाजाने या हॉस्टेलमध्ये विलगीकरणात राहावं लागलं होतं. समांथा आणि दुसऱ्या तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी जयशंकरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतला आहे. जयशंकर हा मुंबईवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या