सरन्यायाधीशांविरोधात आरोप करणाऱ्या महिलेच्या नवऱ्याचे आणि दीराचे निलंबन रद्द

19

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिलेच्या नवऱ्याचे आणि दीराचे निलंबन रद्द करण्यात आले असून त्यांना गेल्या आठवड्यापासून सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. त्या दोघांना चार महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. दिल्ली पोलिस दलात हेड कॉन्सेबल म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सशस्त्र दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांचे निलंबन रद्द केले आहे.

त्या दोघांना गेल्या आठवड्यात पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. मात्र, त्यांची विभागीय चोकशी सुरुच राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या दोघांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. त्या महिलेने 19 एप्रिलला दाखल केलेल्या 28 पानांच्या तक्रारीत 10 आणि 11 ऑक्टोबर 2018 मध्ये सरन्यायाधीशांनी त्यांच्या निवासी कार्यालयात आपले लैंगिक शोषण केले. तसेच आपण तैनात असलेल्या ठिकाणी असभ्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही महिलेने केला होता. या घटनेनंतर अनेकदा आपली बदली करण्यात आली. त्याविरोधात आवाज उठवल्यावर आपली चौकशी करून सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. त्यानंतर आपले पती आणि दीरालाही सेवेतून निलंबित केल्याचा आरोप तिने केला होता.

महिलेने केलेल्या आरोपांबाबत सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी सांगितले की, हे सर्व अविश्वसनीय आहे. यामागे कोणत्या तरी मोठ्या शक्ती काम करत आहेत. अशा घटनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबधित महिला, तिचा नवरा आणि दीराविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे 28 डिसेंबर 2018 रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 2012 मध्ये एका कॉलनीत झालेल्या भाडंणाच्या प्रकरणावरून दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या