हिंदुस्थानातील वनडे, टी-२० क्रिकेटसाठी चेंडू बदलणार

26

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानमध्ये होणाऱ्या आगामी वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. यापुढे हिंदुस्थानात होणाऱ्या वन डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये ‘एसजी’चा पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिंदुस्थानात कसोटी आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ‘एसजी’चा चेंडू वापरला जातो. मात्र वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ‘कुकाबुरा’ हा चेंडू वापरला जात होता. पण यापुढे क्रिकेटच्या या दोन फॉरमॅटमध्येही ‘एसजी’चा चेंडू वापरला जाणार आहे.

‘बीसीसीआय’ने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० स्पर्धेत प्रायोगिक तत्त्वावर ‘एसजी’चा पांढरा चेंडू वापरला होता. त्यानंतर हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांची एक बैठक ‘बीसीसीआय’ने आयोजित केली होती. या बैठकीमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधारांनी ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट ऑपरेशनचे महाव्यवस्थापक साबा करीम यांच्याशी चेंडूबाबत चर्चा केली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आता यापुढे हिंदुस्थानातील वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये ‘एसजी’चा चेंडू वापरण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या