Video – रोज डाळ-भात खायला देत असल्याने खून केले, 12 तासांच्या आत मीरा रोड दुहेरी हत्याकांडाचा उलगडा

1648

मीरा रोड इथल्या शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन जणांचा खून करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून देण्यात आले होते. 5 जून रोजी ही घटना उघडकीस आली होती. ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत या गुन्ह्याची उकल केली असून आरोपीला अटक केली आहे. कल्लू यादव (वय-35) असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ असलेल्या साजन बारमधून त्याला अटक करण्यात आली.

शबरी बारच्या व्यवस्थापक हरीश शेट्टी आणि कामगार नरेश पंडीत यांची हत्या केली झाली होती. कल्लूची चौकशी केली असता त्याने या हत्येची कबुली दिली. हत्येमागचे कारण विचारले असता तो म्हणाला लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद होते आणि दोन्ही मयत तसेच कल्लू हे हॉटेलमध्येच राहात होते. हरीश शेट्टी हा हॉटेलमध्ये स्वत:साठी चांगलुचुंगलं खायला मागवत होता, कल्लू यादवला मात्र डाळभातच खाऊ घालत होता. यामुले भडकल्याने कल्लू यादवने हरीश शेट्टीला जाब विचारला होता. यावर शेट्टी आणि पंडीत या दोघांनी मिळून कल्लूला मारहाण केली होती.

मारहाणीमुळे झालेला अपमान सहन न झाल्याने कल्लू रागात धुमसत होता. शेट्टी आणि पंडीत हे दोघे झोपलेले असता कल्लूने दोघांचा फावड्याने प्रहार करून खून केला. कल्लूने पुरावा पाठी राहू नये यासाठी दोघांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिले आणि त्यांचे मोबाईल घेऊन पळून गेला. कल्लू हॉटेलमधून गायब असल्याने पहिला संशय त्याच्यावरच होता आणि तो खरा ठरला. कल्लू हा सराईत आरोपी असून त्याच्याविरोघात कोलकाता इथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. पुण्यातील स्वारगेट भागामध्ये त्याच्याविरोधात मारामारी आणि दारुबंदीचा गुन्हादेखील दाखल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या