17 वर्षांच्या शेफाली वर्माने केली सचिनच्या विक्रमाशी बरोबरी, दोन्ही डावात झळकावले अर्धशतक

हिंदुस्थानचा महिला क्रिकेट संघ हा देखील इंग्लंड दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाला फॉलो ऑनच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. क्रिकेटरसिक यामुळे थोडे हिरमुसले असले तरी शेफाली वर्माच्या कामगिरीने त्यांना खूश केलं आहे. शेफालीने दोन्ही डावांमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. पहिल्या डावात तर तिचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं होतं. पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणारी शेफाली ही पहिली महिला हिंदुस्थानी क्रिकेटपटू बनली आहे. दोन्ही डावांत 50 पेक्षा अधिक धावा कुटणारी, जगातील सगळ्यात कमी वयाची महिला क्रिकेटपटू हा विक्रमही तिने आपल्या नावावर केला आहे.

शेफालीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. 18 पेक्षा कमी वय असणारा आणि कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू होता. शेफालीने त्याच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे. योगायोग असा आहे की दोघांनी हा विक्रम इंग्लंडविरुद्ध खेळतानाच केला आहे. 1990 साली सचिनने इंग्लंडविरूद्धच्या कसोटीमध्ये दोन्ही डावात अर्धशतक झळकावलं होतं. त्यावेळी त्याचे वय अवघे 17 वर्ष आणि 107 दिवस होतं. शेफालीने जेव्हा हा विक्रम केला तेव्हा तिचे वय 17 वर्ष आणि 139 दिवस होते.

पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या यादीत शेफाली ही चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिला रोहीत शर्मा आणि लाला अमरनाथ यांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड शिखर धवन याच्या नावावर आहे. 2013 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 187 धावा केल्या होत्या. त्याच वर्षी रोहीत शर्माने पदार्पणाच्या कसोटीत 187 धावा केल्या होत्या. लाला अमरनाथ यांनी 1933 साली पदार्पणाच्या कसोटीत इंग्लंडच्या विरुद्ध 156 धावा केल्या होत्या. शेफाली हिने या कसोटीत आतापर्यंत 151 धावा केल्या असून ती अजूनही नाबाद आहे. फॉलोऑनचं दडपण अजिबात न घेता तिने तुफान फटकेबाजी करणं सुरू ठेवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या