दीपिका, मी आणि जॉन म्हणजे अमर, अकबर, अँथनी; ‘पठाण’च्या यशावर शाहरुख खानची प्रतिक्रिया

सुमारे चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळालं आहे. या यशानंतर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या तिघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पठाण या चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्नांना या तिघांनी उत्तरं दिली.

शाहरुख यावेळी म्हणाला की, चित्रपट हे मनोरंजनाचं एक माध्यम आहे, अन्य काहीही नाही. मी तरुणांना एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की, हाच खरा सिनेमा आहे. जे लोक चित्रपट बनवतात, मग ते कोणत्याही भाषेत असोत, सर्वांचा हेतू प्रेक्षकांमध्ये आनंद, दयाभाव, बंधुत्व आणि एकात्मतेची भावना वाढीला लागावी असाच असतो. जर मी बाजीगरमध्ये एक वाईट माणूस म्हणून का केलं असेल किंवा जॉनने पठाणमध्ये वाईट माणसाची भूमिका केली असेल, तर आम्ही फक्त एक व्यक्तिरेखा निभावत प्रेक्षकांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, कोणी वाईट असत नाही, असं तो यावेळी म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, दीपिका पदुकोण अमर आहे, मी शाहरुख खान, मी अकबर आहे. हा जॉन आहे, तो अँथनी आहे. मग तुम्हीच समजा की सिनेमा काय आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही हा चित्रपट बनवतो. आम्ही तुमच्या प्रेमाचे भुकेले आहोत. चित्रपट तिकीटबारीवर कितीही कोटी कमावू दे. पण जे प्रेम प्रेक्षकांकडून मिळतं, त्यांना आमचा चित्रपट पाहून जो आनंद मिळतो, त्यापेक्षा मोठं बक्षीस आमच्यासाठी काहीही नाही, अशा शब्दात शाहरुख खान याने प्रेक्षकांचे आभार मानले.