९० पैलवानांसह दोन महिला मल्लांच्याही कुस्त्या रंगणार, शहीद जवान सूरज मोहिते स्मृती कुस्ती आज जावळीत

77

सामना ऑनलाईन, सातारा

महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी माजी वीर शहीद सूरज सर्जेराव मोहिते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उद्या सोमवार, २० मार्च रोजी शिवदत्त मठ, कासेवाडी, जावळी, सातारा येथे निकाली कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सायंकाळी ४ पासून ही कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. त्यात ९० नामवंत पैलवानांसह दोन महिला मल्लांतही कुस्ती खेळवली जाणार आहे.
उद्योगपती संतोषशेठ मोरे यांनी आपले वडील मारुतीशेठ मोरे यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती दंगल पुरस्कृत केली आहे. या दंगलीत पहिली नंबर एकची कुस्ती पै. संजय सूळ (अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्ठा) व पै. नवनाथ इंगळे (हिंदी केसरी गणपतराव आंदळकरांचा पठ्ठा) यांच्यात होणार आहे.
दुसरी कुस्ती पै. अजय निकम (यशवंत ग्लुकोज कारखाना) व पै. सचिन लवटे (हनुमान आखाडा, वाई) तर तिसरी कुस्ती पै. आकाश शेडगे (किसनवीर कारखाना, भुईज) व पै. नामदेव केसरे, वारणा तालीम रेड) यांच्यात रंगणार आहे.

महिला पैलवानांतही निकाली कुस्ती
९० पुरुष मल्लांसह रंजना डिराळे (पवारवाडी, सातारा) व अर्चना गावडे (वारणा, कोल्हापूर) या महिला पैलवानांतील कुस्ती हे या दंगलीचे एक आकर्षण ठरणार आहे. या दंगलीला सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, उद्योगपती मामा वलखाडे, केशव गाढवे, भरत वरखडे, मस्ताल बदाफ, हाडवैद्य डॉ. सचिन वरखडे, भुईज कारखान्याचे संचालक प्रताप यादव व ‘शिवछत्रपती’ पुरस्कारप्राप्त कुस्ती संघटक संपत साळुंखे उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या