‘कोणी काम देता का काम’, करीनाचा ‘एक्स’ बॉयफ्रेंड झाला बेरोजगार

सामना ऑनसलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मेहनती आणि टॅलेंटेड अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. शाहिदचा ‘कमीने’, ‘उडता पंजाब’ आणि ‘जब वी मेट’ चित्रपट चाहत्यांनी डोक्यावर घेतले. कमावलेली बॉडी, टॅलेंट आणि हिट चित्रपट दिलेला हा अभिनेता सध्या बेरोजगार आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट कबीर सिंह प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहिदने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. शाहिद म्हणाला, कबीर सिंग व्यतिरिक्त माझ्याकडे एकही चित्रपट नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझ्याकडे काम नाही. एकही चित्रपट नसल्याने मलाच माझे मन खात असल्याचेही शाहिद म्हणाला. तसेच मला हे देखील माहिती नाही की मी पुढे काय करणार आहे. परंतु चित्रपटा व्यतिरिक्तही माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचेही तो म्हणाला.

कबीर सिंह या चित्रपटामध्ये शाहिद कपूर कियारा आडवाणी हिच्यासोबत दिसणार आहे. तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हा रिमेक आहे. या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि लोकांना आवडलाही. 21 जून रोजी हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.