शाहीरांचा डफ पुन्हा कडाडणार, ‘शाहिरी लोकरंग’चा २८डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग

89

सामना ऑनलाईन । मुंबई

देशाचा स्वातंत्र्यलढा असू दे वा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, शाहीरांचा डफ कडाडला आणि त्याने समाज चेतवला. महाराष्ट्राची ही समृद्ध शाहिरी परंपरा आज दुर्लक्षित राहिली आहे. तिचे जतन करण्यासाठी मुंबईतील नव्या पिढीचे शाहीर एकत्र आले आहेत. त्यांनी ‘शाहिरी लोककलामंच’ ही संस्था उभारली आहे. ‘शाहिरी लोककलामंच’ने ‘शाहिरी लोकरंग’ या पहिल्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्याचा शुभारंभाचा प्रयोग २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिवाजी नाटय़मंदिर, दादर येथे रंगणार आहे.

‘शाहिरी लोकरंग’ या कार्यक्रमाची संकल्पना शाहीर मधु खामकर आणि महादेव खैरमोडे यांची आहे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे शाहिरी लोककला सुपूर्द करणे हा त्यामागील उद्देश आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, अशोक हांडे, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार आदी उपस्थित राहणार आहेत. हा ज्येष्ठ आणि नवोदित कलावंतांचा कार्यक्रम आवर्जून बघावा, असे आवाहन कार्याध्यक्ष महादेव खैरमोडे यांनी केले आहे.

लोकनृत्याची पर्वणी
ज्येष्ठ नृत्यांगना मंगला आहीर, वैजयंता कडू, सुरेखा काटकर, माणिक मयेकर, नीता पाटील, सुजाता पवार, तेजस्वी वाडेकर, स्नेहल तसेच कस्तुरीमृग आणि महाराष्ट्र लोककला अभिन्यासातील नृत्य कलाकारांचा लोकनृत्य आविष्कार बघण्याची संधी रसिकांना मिळेल.

कार्यक्रमाचे स्वरूप
‘शाहिरी लोकरंग’ कार्यक्रमात लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या, शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील यांची शाहिरी गीते, शाहीर साबळे, विठ्ठल उमप, राजाभाऊ खामकर, विलास जैतापकर, पांडुरंग वनमाळी, बालकराम वरळीकर यांची लोकगीते सादर होतील. ती ज्येष्ठ शाहीर मधू मोरे, कृष्णकांत जाधव, शांताराम चव्हाण, दत्ता ठुले, सुखदेव कांबळे, विष्णू गिलबिले, दादा मांजरेकर आदी मंडळी सादर करतील.

आपली प्रतिक्रिया द्या