‘हुजरांचे रेस्ट हाऊस’ पाडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

35

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येथील ज्या इमारतीत सामाजिक नेतृत्वाची प्रेरणा देणारी ऐतिहासिक घटना घडली ती तत्कालिन ‘हुजुरांचे रेस्ट हाऊस’ नावाने हेरिटेजमधील इमारत बेकायदेशीरपणे पाडणाऱयांवर गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी आज शाहू-भीम स्मारक निर्माण कृती समितीच्या वतीने या जागेवर जोरदार निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना देण्यात आले. दरम्यान, यावेळी काही काळ गोंधळाचीही स्थिती निर्माण झाली होती.

ऐतिहासिक माणगाव परिषदेपूर्वी प्रथमच कोल्हापुरात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनससमोरील ‘हुजुरांचे रेस्ट हाऊस’मध्ये राहिले होते. याच वास्तूत छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक नेतृत्वाचा मंत्र दिला होता. स्वातंत्र्यानंतर ही इमारत शाहूपुरी पोलीस ठाण्यासाठी देण्यात आली होती. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पोलीस ठाणे दुसऱया इमारतीत हलविण्यात आले आहे.

या वास्तूची ऐतिहासिक घटना सर्वप्रथम दैनिक ‘सामना’मधून मांडण्यात आली. त्यानंतर येथे विविध आंबेडकरी संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येऊ लागली. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे जतन करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आल्यानंतर या वास्तूमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येऊ लागली. मात्र, गेल्या दोन वर्षांत अचानक ही इमारत पाडण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा आंबेडकरी समाज संतप्त झाला. या पाडलेल्या जागी मानवी साखळी करून आंदोलनाचे रणशिंगच फुंकण्यात आले.

या पार्श्वभूमीवर ही वास्तू पाडण्यात येऊ नये यासाठी यापूर्वी जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली, हरकती घेण्यात आली. पुरावे सादर करण्यात आले. तरीसुद्धा ही वास्तू जाणीवपूर्वक पाडण्यात आली. यामागे मोठे षडयंत्र आहे. ही वास्तू पाडण्याचा आदेश कोणी दिला याची विचारणा करतानाच संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी शाहू-भीम स्मारक निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी प्रा. शहाजी कांबळे, प्रा. विश्वास देशमुख, डी. जी. भास्कर, उत्तम कांबळे, विद्याधर कांबळे, अनिल म्हमाणे, बाजीराव नाईक आदी विविध आंबेडकरी पक्षसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या