राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष झाले वंचितचे उमेदवार; वसमतला दांडेगावकरांची डोकेदुखी वाढली

प्रकृती अस्वस्थाचे कारण पुढे करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले शेख फरीद इस्तीयाक पटेल उर्फ मुनीर पटेल यांनी वसमत विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडुन उमेदवारी मिळविली आहे. वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पटेल यांच्या नावाचा समावेश असुन त्यांच्या उमेदवारीमुळे वसमतमधील राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व अन्य इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील रहिवासी असलेले शेख फरीद इस्तीयाक पटेल हे हिंगोली जिल्ह्यामध्ये मुनीर पटेल या नावाने सर्व परिचित आहेत. सहा वर्षापेक्षा अधिक काळ राष्ट्रवादीची सत्ता असतांना व त्यानंतरही दोन वर्ष मुनीर पटेल यांच्याकडे राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्षपद होते. तसेच जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती म्हणुनही त्यांनी काम पाहिले आहे. जवळाबाजारचे माजी सरपंच असलेले फैसल पटेल या पुत्राला मुनीर पटेल यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पाठविले होते. त्यानंतर ३ महिन्यापुर्वी त्यांनी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठवून दिला होता. वंचित बहुजन आघाडीने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील ५० च्यावर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातून मुनीर पटेल यांना वंचितची उमेदवारी देण्यात आली आहे. पटेल यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेचा फायदा घेत जवळाबाजार व औंढा नागनाथ येथे शैक्षणिक संस्था सुरु केल्या आहेत. पटेल यांच्या उमेदवारीमुळे वसमतमधुन राष्ट्रवादीकडुन इच्छुक असलेले माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि माजी सभापती राजु नवघरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या