राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये घेउन ४४ जणांची मिळून तब्बल साडेचार ते पाच कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.

शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पोपट हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी मिळवायची होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत असताना जून २०१९ मध्ये पोपट यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने फिर्यादीला आपली बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानुसार मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे सांगितले. आरोपी दादासाहेब याने पोपट यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले. मात्र, काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने फिर्यादी पोपटने आरोपीला पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली.

शिक्षण विभागात नोकरीच्या आमिषाने आरोपींनी ४४ जणांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये घेउन साडेचार ते पाच कोटींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधितांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे- अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे