शाकिबची युवराजच्या विक्रमाशी बरोबरी, अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत सोमवारी बांग्लादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. बांग्लादेशच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसन याने. शाकिबने फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार कामगिरी करत हिंदुस्थानचा माजी खेळाडू युवराज सिंहच्या विक्रमाशी बरोबरी केली.

शाकिबने अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीत अर्धशतक (51 धावा) ठोकले आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. त्यानंतर गोलंदाजीत 5 बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे तोडले आणि संघाला विजय मिळवून दिला. वर्ल्डकप लढतीत अर्धशतक आणि 5 बळी घेणारा शाकिब फक्त दुसरा खेळाडू आहे. याआधी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि 2011 च्या वर्ल्डकपचा मालिकावीर युवराज सिंहने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकले होते आणि गोलंदाजीत पाच बळी घेतले होते.

सर्वाधिक धावा आणि 10 बळी
वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू शाकिब जबरदस्त फॉर्मात आहे. 6 लढतीत त्याने 476 धावा चोपल्या आहेत. सध्या तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहे. शाकिबने आतापर्यंत दोन शतक आणि तीन अर्धशतक ठोकले आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये 6 लढतीत 10 बळीही घेतले आहेत.