पत्नीच्या कपड्यांवर मतप्रदर्शन करणाऱ्यांना शमीने दिले सडेतोड उत्तर

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेटपटू मोहम्मद शमी याने पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोत शमीच्या पत्नीने परिधान केलेल्या आधुनिक कपड्यांवर बुरसटलेल्या विचारांच्या नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. काही जणांनी खालची पातळी गाठत अश्लिल मतप्रदर्शन केले होते. या प्रकाराला शमीने मोजक्य शब्दात सडेतोड उत्तर दिले आहे.

काही जणांनी शमीच्या फेसबुकवरील फोटोवर आक्षेप घेत त्याच्या पत्नीने परिधान केलेले कपडे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तू कट्टर सुन्नी मुसलमान असून पत्नीला असे कपडे घालण्याची परवानगीच कशी देऊ शकतोस असा सवाल केला आहे. आपला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एकाने इरफान पठाणचे उदाहरण दिले आहे. मात्र हिंदुस्थानी क्रिकेट संघाकडून खेळलेल्या मोहम्मद कैफने शमीच्या फोटोमध्ये काहीच गैर नसल्याची भूमिका घेत टीकाकारांवर जगात इतरही विषय आहेत याची आठवण करुन दिली.

टीकेची पातळी घसरत असल्याचे पाहून टीकाकारांना उत्तर देण्यासाठी शमीने त्याचे पत्नी आणि मुलासोबतचे आणखी काही फोटो फेसबुकवर टाकले. हे दोघे माझे जीवनभराचे जोडीदार आहेत. त्यांच्या बाबतीत काय चांगले आणि काय वाईट हे इतरांपेक्षा जास्त मला चांगले समजते.