श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा!

>>स्वाती प्रदीप विप्रदास<<

सद्गुरू श्री शंकर महाराजांचा ७० वा समाधी सोहळा २७ एप्रिलपासून पुण्यातील धनकवडी येथील मठात सुरू होत आहे. दरवर्षी समाधी सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आलेला आत्मानुभव हा शब्दात मांडता येत नाही. तो फक्त मनात उमटतो.

मी या साधकाला हे दिले, त्या साधकाला ते दिले, असे संत सांगत बसत नाहीत. दिवसेंदिवस साधकांची गर्दी मठाकडे वाढताना दिसत आहे. मनाची अनुभूती प्रत्येक साधकाला आलेली असते. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ या ओळीच्या अर्थानुसार साधकांची अनुभूती त्यांना उत्सवाकडे खेचते, हेच शांतता लाभल्याचे प्रतीक आहे. अशांत मनाला शांत कसं करायचं हे शास्त्र त्यांनाच अवगत आहे.

जर मन थाऱ्यावर असेल तरच माणूस योग्य मार्गाने जाऊ शकतो. हे मन सद्गुरूंच्या ताब्यात द्यावं आणि नाम आपल्या जिभेवर ठेवावं, यापेक्षा वेगळी साधना नाही. मग ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.

जो संत चरणावरी लीन झाला त्याचा आयुष्याचा मार्ग मोकळा झाला. क्षणोक्षणी प्रश्न पडतात नित्याच्या आयुष्यात, मग मार्गदर्शक म्हणून सद्गुरू बॅटरीचे कार्य करतात. या भवसागराच्या प्रवाहात बुडू देत नाही. दंभ व अहंकाराचा वारा लागू देत नाही. आयुष्य जगण्याचे सामर्थ्य देतात, धैर्याने मार्ग कसा चालायचा हे शिकवतात. कितीही वाईट विचारांचे झंझावात आले तरी ते उडवून लावत नाहीत. सांभाळतातच.

काय चांगले काय वाईट याचे ज्ञान वेळोवेळी देतात. कोठे जा, कोठे जाऊ नको हे शिकवतात. शिक्षकाचे, आईचे अशी दोन्ही कामे सद्गुरूच करतात. अशा या सद्गुरू शंकर महाराजांचा समाधी सोहळा २७ एप्रिल ते ३ मेपर्यंत पहाटे चारपासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असतो. मठात सातही दिवस २४ तास नामसप्ताह सुरू असतो. एकदा प्रतिपदेला वीणा हातात घेतली की ती आळीपाळीने हातात घेऊन अखंड नामस्मरण अष्टमीपर्यंत सुरू असते. अष्टमीच्या दुसऱया दिवशी काल्याचे कीर्तन होते. दहीहंडी होते आणि कार्यक्रमाची सांगता होते.

पहाटे चारला सद्गुरूंच्या समाधीला स्नान घालून चंदनाचा लेप लावून काकडआरती होते. सकाळी, दुपारी, सायंकाळी आरती होते. दुपारी बारा वाजता आरतीनंतर द्रोणातून खिचडीचा प्रसाद वाटण्यात येतो. सायंकाळी पण द्रोणातून खिचडी किंवा इतर विविध प्रकारची मिठाई वाटप होते. लघुरुद्र, महारुद्र असे कार्यक्रम सकाळी आरतीनंतर होतात. सातही दिवस रुद्राभिषेक होत असतो.

दुपारी २ ते ४ भजन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम होतात. ६ ते १० या वेळेत कीर्तन गायन, सुगम संगीत अशी गायनाची सेवा होते. प्रचंड जनसागर या सर्व सेवांचे लाभ घेतात.

शिवाय लघुरुद्र, महारुद्र, गणेश याग, सूर्य याग, विष्णुयाग, सप्तशती असे धार्मिक कार्यक्रम मठात होत असतात. येणाऱया भक्तांना सुख, शांती, लाभावी, समृद्धी लाभावी यासाठी हे कार्यक्रम होत असतात. रात्री दहानंतर मठातील भजनी मंडळ पहाटे साडेतीनपर्यंत भजनाचा कार्यक्रम करतात. अशी रेलचेल आणि भरगच्च कार्यक्रमाची पर्वणीच सर्व साधकांना अनुभवयास मिळते.

 

आपली प्रतिक्रिया द्या