पैठणकरांनी दिला शंकराचार्यांच्या आठवणींना उजाळा

27

सामना ऑनलाईन । पैठण

तेहतीस वर्षांपूर्वी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी चातुर्मासाच्या निमित्ताने पैठणनगरीत ४ महिने मुक्काम केला होता. या काळात तत्कालीन उपराष्ट्रपती आर. वेंकटरमण, पैठणचे सुपुत्र तथा तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण व तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी या संतनगरीत येउâन जगद्गुरूंचे दर्शन घेतले होते. या दरम्यान अध्यात्म क्षेत्रातल्या जगभरच्या दिग्गजांची नाथनगरीतील वर्दळ चर्चेचा विषय ठरली होती. एकूणच हिंदुत्वाच्या धार्मिक वातावरणात हे प्राचीन धर्मपीठ अक्षरशः न्हाऊन निघाले होते! शंकराचार्यांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर पैठणकरांनी या आठवणींना उजाळा दिला.

१९८५ साली कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे पैठणला आगमन झाले. देशातल्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रात चातुर्मासाचा कालावधी व्यतीत करणे, तेथून शिव न ओलांडता त्या क्षेत्रातच चार महिने धार्मिक विधी करणे. अशा धार्मिक परंपरेनुसार त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पैठण तीर्थक्षेत्राची निवड केली होती. माजी मंत्री अनिल पटेल हे त्यावेळी नगराध्यक्ष होते. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. संत ज्ञानेश्वर उद्यान मार्गावर असलेल्या माहेश्वरी धर्मशाळेत शंकराचार्यांचा मुक्काम होता. जवळच असलेल्या जायकवाडी धरणाच्या भिंतीखालील गोदावरी नदीपात्रात शंकराचार्य व त्यांचे तामिळी शिष्यगण पवित्र स्नान करत असत. पैठण शहरात तामिळी वेशभूषेतील महिला पुरुषांची यात्राच भरलेली पाहायला मिळाली.

देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती आर. वेंकटरमण आले होते. हिंदुस्थानचे तत्कालीन गृहमंत्री तथा पैठणचे भूमिपुत्र शंकरराव चव्हाण व तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह अनेक मंत्री आले होते. याबाबत बोलताना माजी मंत्री तथा तत्कालीन नगराध्यक्ष अनिल पटेल यांनी सांगितले की, ‘शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना सलग ४ महिने जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्याचे भाग्य मिळाले. पैठण नगर परिषदेच्या वतीने धर्मगुरुंना मानपत्र देण्याचे अहोभाग्य लाभलेला मी एकमेव नगराध्यक्ष आहे.’ अशी कृतज्ञता अनिल पटेल यांनी व्यक्त केली. हिंदू धर्म व देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण कायम राहील, अशी भावपूर्ण श्रध्दांजली त्यांनी अर्पण केली.

आपली प्रतिक्रिया द्या