47व्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे ,राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

573

न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज सोमवारी देशाच्या 47 व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अयोध्यासह अनेक ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निकालांमध्ये न्यायाधीश शरद बोबडे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. 63 वर्षीय न्यायाधीश बोबडे यांच्या आधी रंजन गोगोई सरन्यायाधीशपदावर होते. राष्ट्रपती भवन येथील दरबार हॉलमध्ये हा शपथग्रहण सोहळा पार पडला. सरन्यायाधीश शरद बोबडे 17 महिने या पदावर राहणार असून 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होत आहेत. गोगोई यांनीच बोबडे यांच्या नावाची सरन्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती.

  शपथग्रहण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोठय़ा संख्येने मंत्रीही उपस्थित होते. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीशही उपस्थित होते. बोबडे यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली असून गोगोई यांनीच बोबडे यांचे नाव सुचवले. शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे प्रसिद्ध वकील होते.

कोलोजियमप्रकरणी सावध पवित्रा

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कोलोजियमप्रकरणी सावध पवित्रा घेण्याचे ठरवले आहे. याबद्दल वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोबडे म्हणाले, देशात न्यायाधीशांच्या अनेक जागा रिक्त आहेत. तसेच न्यायिक पायाभूत सुविधांचाही मोठय़ा प्रमाणावर अभाव आहे. मात्र आपण तर्कावर आधारित भूमिका घेण्याचे ठरवले असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निर्णयांचा आपल्याला आदर असल्याचे बोबडे यांनी सांगितले.

न्यायाधीश बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 मध्ये नागपूरमध्ये झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कला आणि कायदा विषयाची पदवी घेतली. 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 21 वर्षे त्यांनी सेवा दिली. न्यायाधीश बोबडे यांनी 29 मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. 16 ऑक्टोबर 2012 मध्ये मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश बनले, 12 एप्रिल 2013 मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या