शिवाजी नाही ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणा, शरद केळकरचा व्हिडीओ व्हायरल

7391

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी अभिनेता शरद केळकर याच्या एका उत्तरामुळे अवघा महाराष्ट्र त्याचा फॅन झाला आहे. ट्रेलर प्रदर्शनावेळी एका पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हे लक्षात येताच शरद केळकरने त्यांना थांबवत शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असे उत्तर दिले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शरद केळकर याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अजय देवगणने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे, तर शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद केळकर याला चित्रपटात साकारत असणाऱ्या भूमिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. या दरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारताना शिवाजी महाराजांचा केवळ शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरने त्याला थांबवत नम्रपणे त्या पत्रकाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करायला सांगितले. शरद केळकरच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली.

शरद केळकर याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘एकच छावा, शरद केळकर भावा’, ‘शाब्बास शरद केळकर, जिंकलस भावा…..’, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या