शरद पवारांच्या गाडीचे ‘स्टेअरिंग’ उदयनराजेंच्या हातात

udayanraje

सामना प्रतिनिधी । सातारा

‘पक्षबिक्ष गेला खड्डय़ात, जनता हाच माझा पक्ष’ असे म्हणत पक्षनेतृत्वाला आव्हान देणारे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी पुणे ते सातारा या प्रवासादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लँड क्रूझर’गाडीचे ‘स्टेअरिंग’ हातात घेत पवार यांचे सारथ्य केल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२००९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधी राहिलेच नाहीत. मात्र लोकसभा निवडणूक काही दिवसांकर येऊन ठेपली असतानाच उदयनराजेंच्या ‘सारथ्य डिप्लोमसी’मुळे पवार घराणे आणि सातारच्या छत्रपती घराण्यांमधील संबंधामध्ये बिब्बा घालणाऱ्या मंडळींना यानिमित्ताने चपराक बसली असल्याचे बोलले जात आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित सातारा दौऱ्याकडे राष्ट्रवादीजनांसह इतरांचेही लक्ष लागले होते. उदयनराजे यांनी पवारांना पुण्यातूनच ‘हायजॅक’ करीत त्यांच्या गाडीच्या ‘स्टेअरिंगचा’ ताबा घेतला. खासदार पवार यांनी ‘जाने भी दो यारो’ म्हणत छत्रपतीचे सारथ्य कबूल केले. आनेवाडी टोलनाका येईपर्यंत उदयनराजेंनी गाडी चालवली. दरम्यान, पुणे ते आनेवाडीदरम्यान खासदार पवार व खासदार उदयनराजेंमध्ये सातारच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

काम करताना आरोप झाले की वेदना होतात! – खासदार उदयनराजे
‘मी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो त्यावेळी माझ्यावर तोडपाण्याचे आरोप केले जातात. काम करताना आरोप झाले की खूप वेदना होतात अशी उद्विग्न प्रतिक्रिया साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या