पवारांनी उलगडले मोदींच्या वक्तव्याचे रहस्य

21

सामना प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सर्वात आक्रमक भूमिका घ्यायचे. त्यामुळे साहजिकच काँग्रसेचे मत त्यांच्याबद्दल वेगळे होते. मात्र मी त्याला अपवाद ठरलो. कारण गुजरातमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पन्नवाढीसाठी जे मुख्यमंत्री प्रयत्न करतात त्यांना केंद्रातून पूर्ण ताकदीने मदत करण्याची भूमिका मी घेतली. कदाचित म्हणूनच मोदींनी ‘मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो’, असे वक्तव्य केले असावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामागचे रहस्य उलगडले.

कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे यंदाचा ‘कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ अन्नपूर्णाच्या संस्थापिका डॉ. मेधा पुरव-सामंत, शिल्पकार विवेक खटावकर आणि रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

…म्हणून दिल्लीला जाणे टाळत होतो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो’ या वक्तव्यामुळे मी दिल्लीला जाणे येणे टाळत होतो. जरी दिल्लीत गेलोच तरी सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटत नव्हतो, असा खुलासा शरद पवार यांनी केला. तसेच मोदींच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली तर पत्रकार उगाचच ‘बोटा’च्या अनुषंगाने काहीतरी छापतील, अशी भीती वाटत होती, अशी कबुलीही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या