काकांनी आंदोलन पेटवले, पुतण्यामुळे फुस्स झाले; भुजबळ वैतागले

2070

ईडीविरोधातील आंदोलन शिखरावर पोहोचलेले असताना अजित पवार यांनी राजीनामा द्यायला नको होता असं स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मांडले आहे. ‘राजीनामा देण्याचे काय कारण होतं ? निदान तो दोन दिवसांनी द्यायला हवा होता. हे प्रकरण आणि आंदोलन शिखरावर पोहचलेले होते, निवडणुकीच्यादृष्टीने त्याला महत्व होते. अशा परिस्थितीत अजित पवारांनी असे करायला नको होते.’ असे स्पष्ट मत भुजबळांनी मांडले आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबात अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी नाव न घेता तो निर्णय भुजबळांचा होता असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत जेव्हा भुजबळांना विचारण्यात आलं तेव्हाही त्यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या तोंडसुख घेतलं. ‘अजित पवार यांनी त्यावेळी सरळ सांगायला हवे होते की मी त्यावेळी ज्युनिअर होतो, हा प्रश्न माझ्यासाठी नाहीये. या प्रश्नाचे भुजबळ देतील. आम्हालाही अडचणीचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी अशी उत्तरे त्यांना देता आली असती.’ असे भुजबळ म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांच्या अटकेच्या विषयावरून भुजबळांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची गाडी त्यांनी शरद पवारांविरोधात ईडीच्या कारवाईकडे वळवली. ते म्हणाले की ‘अजित पवारांनी त्यावेळी राजीनामा द्यायची काहीच गरज नव्हती. तो राजीनामा दोन दिवसांनी दिला असता तरी चाललं असते. ‘त्यादिवशी अतिशय प्रचंड आग राजकारणामध्ये पेटली होती. फोकस होता तो शरद पवार यांच्यावर ईडीच्या कारवाईसंदर्भातला. शरद पवार हे बँकेचे संचालक किंवा सदस्य नसतानाही त्यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. त्यावेळी जे वातावरण पेटलं होतं, त्यामुळे दोन दिवस मीडिया व्यापला गेला असता. संध्याकाळ होत आली आणि पटदिशी सगळा फोकस बदलला. यामुळे काय फायदा-तोटा झाला हे ज्याचं त्याने ठरवावे.’ असे हताश उद्गार भुजबळ यांनी काढले.

आपली प्रतिक्रिया द्या